आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्‍ये महिला अधिका-याकडे 19 कोटींची संपत्ती, आर्थिक गुन्हे तपास पथकाची कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारमध्ये एका महिला अधिका-याच्या घरासह इतर ठिकाणांवर टाकण्यात आलेल्या छाप्यात 19 कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली. जयश्री ठाकूर असे या अधिका-याचे नाव असून त्या भागलपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत. आर्थिक गुन्हे तपास पथकाने ही कारवाई केली.


ठाकूर यांच्या पाटणा, भागलपूर, गोड्डा, बांका भागातील ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेकडून मुझफ्फरपूरमध्ये गृहनिर्माण विभागातील सहायक अभियंता शिवनंदन साह यांच्यावर टाकण्यात आलेल्या छाप्यात दीड कोटी रुपयांची संपत्ती दिसून आली. साह यांच्या मुझफ्फरपूरमधील तीन ठिकाणी ही कारवाई झाली. साह यांनी पत्नी, सासू एवढेच नव्हे तर एजंटच्या नावावरही जमीन खरेदी केली असल्याचे उजेडात आले आहे. मुझफ्फरपूर व नालंदामध्ये 13 ठिकाणी जमीन खरेदी केल्याचे दस्तऐवज त्यांच्याकडे सापडले आहेत. याशिवाय विविध बँकांमध्ये सुमारे 40 लाख रुपयांची रक्कम जमा असल्याचे तपास अधिका-यांना दिसून आले.


खात्यावर 15 कोटी
जयश्री ठाकूर यांच्या भागलपूरमधील बँक ऑफ बडोदाच्या तीन खात्यांवर 7 कोटी 86 लाख 85 हजार रुपये व सृजन महिला विकास समिती लिमिटेड, सबोरमध्ये 7 कोटी 32 लाख 55 हजार 796 रुपये जमा आहेत. त्याचबरोबर त्यांच्याजवळ 22 एकर जमिनीची कागदपत्रे, एक लाख 25 हजार रोख, एसबीआयच्या खात्यावर 16 लाखांहून अधिक, कॅनरा बँकेत 4 लाख, युको बँकेत 2 लाखाहून अधिक रक्कम आहे. शिवाय एलआयसीमध्ये गुंतवणूक आहे. एचडीएफसीमध्ये 2 लाखांहून अधिक, सुमारे 50 लाखांचे दागिने, इंडिगो कार, स्कॉर्पिओ गाडी असल्याचे उघड झाले आहे. ठाकूर यांच्या नावावर 22 एकर जमीनही आहे.