जोधपूर - अवैध शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सलमान खान सरकारच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यात जामीन घेण्यासाठी शुक्रवारी न्यायालयात हजर झाला. विमानतळावरून जिल्हा सत्र न्यायालयात त्याने २० हजार रुपयांचा जातमुचलका भरला.
अवघ्या तीन मिनिटांत सलमानने सर्व औपचारिकता पूर्ण केली आणि तो मुंबईला परतला. आता या प्रकरणी ५ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सलमान खान १२.४५ रोजी एडीजे न्यायालयात दाखल झाला. त्याचे वकील हस्तीमल सारस्वत उपस्थित होते. सलमानने २० हजार रुपयांचा जामीन बाँड आणि तितक्याच रकमेचा मुचलका सादर केला. त्यानंतर सलमान पुन्हा विमानतळाकडे रवाना झाला. अवैध शस्त्रास्त्र प्रकरणात त्याची सुटका झाल्यानंतर सरकारने पुन्हा याचिका दाखल केली आहे.
सलमान यामुळे झाला कोर्टात हजर
सलमानविरुद्ध 1998 पासून जोधपुरात अवैध रीतीने शस्त्रे बाळगणे आणि त्याद्वारे शिकार करण्याचे प्रकरण सुरू आहे. ट्रायल कोर्टाने त्याला जानेवारी महिन्यात या केसमधून मुक्त केले होते.
- सलमान खानला मुक्त करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने सेशन कोर्टात आव्हान दिले. राज्य सरकारच्या याचिकेवर कोर्टाने सलमानला नोटीस जारी केली आहे. त्याने बेल बाँड भरण्यासाठी कोर्टात हजर राहण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
बेल बाँड भरण्यासाठी त्याला मागच्या महिन्यातच जोधपुरात यावे लागणार होते, परंतु न्यायाधीशांची बदली झाल्याने प्रकरणाची सुनावणी टळली.
- याच प्रकरणात बेल बाँड भरण्यासाठी सलमान शुक्रवारी जोधपूर कोर्टात हजर झाला होता.
सलमानविरुद्ध काळवीट शिकारीची 3, तर आर्म्स अॅक्टचे 1 प्रकरण
- 1998 मध्ये हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानवर 3 वेगवेगळ्या जागांवर काळविटांची शिकार केल्याचा आरोप होता.
- जोधपूरनजीक भवाद गावात 2 काळवीट, घोडा फार्ममध्ये 1 काळवीट आणि कंकाणी गावात 2 काळवीटांची शिकार करण्यात आली होती.
- भवाद आणि घोडा फार्ममध्ये झालेल्या शिकारीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सलमानला 1 आणि 5 वर्षे कैदेची शिक्षा ठोठावली होती.
- नंतर हायकोर्टाने दोन्ही प्रकरणांतून सलमानला मुक्त केले. आता या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.
-कंकाणी गावात झालेल्या दोन काळवीटांच्या शिकारीच्या प्रकरणात सध्या कनिष्ठ न्यायालयात सुनावणी सुरू आहे.