आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये पंधरा तासांच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुमारे १५ तासांपर्यंत चाललेल्या एका चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. दरम्यान, या चकमकीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला आणि दोन जवानांसह अन्य तिघेही जखमी झाले. नागरिकाच्या मृत्यूमुळे या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. लोकांनी आंदोलन करत जवानांवर दगडफेक केली. मात्र, लष्कराने परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी या प्रकरणी मंगळवारी कुलगाम बंदचे आवाहन केले आहे.

लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील रेदवानी गावात दोन दहशतवादी लपल्याची माहिती रविवारी रात्री मिळाली. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त चमूने या गावाला चहुबाजूंनी वेढा घातला. दरम्यान, दहशतवाद्यांनी चमूवर गोळीबार केला, परंतु अंधार असल्याने कारवाई थांबवण्यात आली. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा लष्कर आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू झाली. त्या वेळी ज्या घरात दहशतवादी दबा धरून बसले होते. ते घरच लष्कराने उडवून टाकले. त्यात दोघेही ठार झाले. चकमकीत आसिफ अहमद या नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला. रेदवानीचा जावेद अहमद बट आणि यारीपोराचा इदरिश नॅगरू अशी दहशतवाद्यांची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...