आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढुर्णाच्या गोटमारीत 200 गावकरी जखमी; शेकडो वर्षाची परंपरा, सावरगावकरही सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरूड- मध्य प्रदेशातील पांढुर्णा व सावरगावच्या सीमेवर  मंगळवारी ( दि. २२) झालेल्या ऐतिहासिक गोटमारीत सुमारे दोनशेहून अधिक गावकरी जखमी झाले असून, चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले. यात सावरगाव येथील ८० तर पांढुर्णा येथील १०० हून अधिक भाविकांचा समावेश आहे.  उर्वरित जखमींवर पांढुर्णा येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दोन्ही गावांपैकी कुण्याही भाविकाला ऐतिहासिक झेंडा तोडता न आल्याने रात्री उशिरापर्यंत गोटमार सुरू होती.   
 
मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक गोटमार केली जाते. अनेक वर्षांपूर्वी पेंढाऱ्यांना पळवण्यासाठी ही गोटमार सुरू केली.   काही जणांच्या मते तत्कालीन प्रेमविवाहाला  विरोध करण्यासाठी ही गोटमार केली जात होती, अशी अाख्यायिका आहे. पांढुर्णा व सावरगाव येथील युवक-युवतींनी अनेक वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. विवाहाला विराेध करून सावरगावच्या वधूला पांढुर्णात येता येऊ नये म्हणून गोटमार केली होती. त्या वेळी या गोटमारीत विवाहित प्रेमीयुगुलाचा मृत्यू झाला होता. या जोडप्याला चंडीमातेच्या मंदिराजवळ समाधी दिली होती. त्यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून शेकडो वर्षांपासून दरवर्षी ही गोटमार होत असते, अशी अाख्यायिका आहे. त्या अाधारे वर्षानुवर्षे ही परंपरा साजरी केली जाते.
 
प्रशासनाने हलवला झेंडा    
सीमेवरील दोन्ही गावांतील नागरिकांकडून झेंडा हलवण्यात न आल्याने रात्री उशिरापर्यंत गोटमार सुरू होती. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास झेंडा कुणीही न नेऊ शकल्यामुळे प्रशासनाने दोन्ही गटांच्या सहमतीने झेंडा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पालिकेच्या ट्रॅक्टरने हा झेंडा चंडीमातेच्या मंदिरात आणला. दोन्ही गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर गोटमारीचा समारोप केला.
बातम्या आणखी आहेत...