आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये मार्चपर्यंत 250 युवक दहशतवादी संघटनांत सहभागी, सुरक्षा संस्थांचा अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनंतनाग - गेल्या जुलैत झालेल्या आंदोलनानंतर काश्मीरमध्ये अनेक युवक दहशतवादी संघटनांत सहभागी होत आहेत. मार्चपर्यंत हा आकडा जवळपास २५० वर पोहोचला असल्याचा दावा सुरक्षा संस्थांनी केला आहे.   
 
युवकांचा कल दहशतवादी संघटनांत सहभागी होण्याकडे आहे. पोलिस त्याबाबत चुप्पी साधून आहेत. आम्ही बेपत्ता युवकांच्या अहवालाची तपासणी करत आहोत, असेच फक्त ते सांगत आहेत. पण प्रत्यक्षातील, विशेषत: दक्षिण काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक आहे आणि तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे, असे या संस्थांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ८ जुलैला हिजबुल मुजाहिदीनचा बुरहान वानी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. त्यानंतर स्थानिक युवकांचा दहशतवादी संघटनांत सहभागी होण्याकडे कल वाढला आहे.  

सुरक्षा दलांतील सूत्रांनुसार, सध्याचा दहशतवाद आणि १९९० च्या सुरुवातीच्या काळातील दहशतवाद यातील फरक म्हणजे सध्याच्या दहशतवाद्यांचे तात्त्विक मत हे त्याआधीच्या दहशतवाद्यांपेक्षा खूप भक्कम आहे. काश्मीरमध्ये सध्या ‘पॅन-इस्लामायझेशन’चा कल दिसत आहे. ठार मारले जाऊ हे माहीत असूनही तरुण मुले दहशतवादाचा मार्ग अवलंबत आहेत. शोपियान, कुलगाम, पुलवामा आणि दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरा तसेच बाह्य श्रीनगरच्या काही भागातील युवक बेपत्ता आहेत.

दक्षिण काश्मीरच्या विविध भागांत विदेशी दहशतवाद्यांच्या हालचालीही वाढल्या आहेत. या भागाची खडान् खडा माहिती असलेल्या स्थानिक प्रशिक्षित दहशतवाद्यांची साथ त्याला मिळत आहे. दहशतवादी संघटनांच्या भरतीच्या याद्यांत दररोज नवी नावे दिसत पोलिस चिंतित आहेत. पाकिस्तानमधून घुसखोरी करत असलेले दहशतवादी विविध स्थानिक दहशतवादी गटांत समानपणे विभागले गेले आहेत. स्थानिक दहशतवाद्यांकडून त्यांना या भागाची माहिती मिळते, सुखरूप बाहेर पडण्याच्या मार्गांची माहिती होते, हे युवक त्यांना या भागात उघडपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची माहितीही देतात.

हिजबुल, लष्कर भरती करणारे गट
हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा हे गट युवकांची भरती करत आहेत, तर जैश-ए-मोहंमदसारखा पाकिस्तानमधील गट त्यांचा मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. दहशतवादी दक्षिण आणि उत्तर काश्मीर या दोन अक्षांवर लक्ष केंद्रित करत आहेत,अशी माहितीही सूत्रांनी दिली.

‘वर्षभर काश्मीर मुद्दा धगधगता ठेवा’
‘हिजबुल’चा दहशतवादी आमिर वागाय याच्या अटकेमुळे आगामी काही महिन्यांत दहशतवादी कारवायांत वाढ होईल, अशी भीती सुरक्षा संस्थांना सतावत आहे. संपूर्ण वर्षभर काश्मीर मुद्दा धगधगता ठेवा, अशा स्पष्ट सूचना दहशतवाद्यांना मिळाल्या आहेत,असे आमिरने चौकशीत सांगितले. तो गेल्या वर्षी दहशतवादी गटात सहभागी झाला होता. त्यामुळे तो दहशतवाद्यांच्या योजनांवर फार प्रकाश टाकू शकला नाही, असे सूत्र म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...