आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकची हाराकिरी: एक मेजर, जवानासह १० लोक गोळीबारात जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सध्या प्रचंड तणाव आहे. शुक्रवारी दिवसभर पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांसह सीमेलगतच्या गावांवरही गोळीबार केला. यात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, भारतीय लष्कराचा एक मेजर व बीएसएफच्या एका जवानासह १० जण जखमी झाले आहेत. या गोळीबाराला भारतीय जवानही चोख प्रत्युत्तर देत आहेत. गेल्या आठवडाभरात भारतीय लष्कराने पाकचे १५ रेंजर्स टिपले आहेत. दरम्यान, हा तणाव वाढत चालला असून कोणत्याही क्षणी पाकिस्तान पूर्ण क्षमतेने हल्ला करू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय हद्दीत सीमेलगत असलेल्या गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे बहुतांश गावे निर्मनुष्य आहेत. या लोकांनी सरकारी मदत छावण्यांत आश्रय घेतला आहे. शुक्रवारी सीमेलगत सुमारे ३० व नियंत्रण रेषेवर १० चौक्यांवर पाक सैनिकांनी गोळीबार केला. यात २१-पंजाब रेजिमेंटचे मेजर अजितसिंग तसेच बीएसएफचा जवान बी. वेंकटेश यांच्यासह १० जण जखमी झाले.

जवान शहीद, मृतदेहाची अतिरेक्यांनी केली घोर विटंबना
नियंत्रण रेषेवर पाक अतिरेक्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. या वेळी चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला. एक अतिरेकीही मारला गेला. अतिरेक्यांनी पळून जाण्यापूर्वी शहीद जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली. यादरम्यान पाक सैनिक गोळीबार करत राहिले.
गृहमंत्र्यांचे आवाहन...
पाकच्या या गोळीबाराला त्यांच्या १० पट क्षमतेने प्रत्युत्तर द्या, असे आवाहन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लष्कराला दिले आहेत. अरुणकुमार म्हणाले, पाक सैनिकांनी चालवलेल्या गोळीबाराच्या आडून भारतात अतिरेकी घुसवले जात असून शुक्रवारी असे दोन प्रयत्न हाणून पाडण्यात आले. भारतीय जवान पाकिस्तानी नागरिकांवर गोळीबार करत नाहीत, ते फक्त गोळीबाराला चाेख प्रत्युत्तर देत आहेत.

माजी पोलिसासह ६ अतिरेकी पकडले
श्रीनगर- बेमिना भागात लपून बसलेल्या सहा अतिरेक्यांना पोलिसांनी पकडले. यात एक माजी पोलिस आहे. पोलिस खात्यात असलेला खुर्शीद अहमद याने नोकरी सोडून दहशतवादाचा मार्ग पत्करला होता. या अतिरेक्याकडून एके-४७ सह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. कुलगाममध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याला पोलिसांनी पकडले.
बातम्या आणखी आहेत...