आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगींच्या मतदारसंघात मृत्यूचे तांडव: 23 बालकांसह 30 रुग्ण ऑक्सिजनअभावी दगावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ गारेखपूर येथील बाबा राघव दास (बीआरडी) वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्यामुळे ४८ तासांत २३ मुलांसह ३० रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी गुजरातची कंपनी पुष्पा सेल्सने ६९ लाख रुपयांचे बिल थकल्याच्या कारणावरून पुरवठा बंद केला होता. बुधवारी ऑक्सिजन टाकी रिकामी झाली. याच दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. बीआरडी महाविद्यालयात दोन वर्षांपूर्वी द्रवरूप ऑक्सिजन प्रकल्प स्थापन केला. येथून १०० खाटांच्या इन्सेफेलायटिस वॉर्डसह ३०० रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरण (गीडा), सशस्त्र सीमा दल व खासगी रुग्णालयांची मदत मागितली होती. गुरुवारी दिवसभर ९० जंबो सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवला. रात्री १ वाजता ही खेप संपली. यानंतर गोंधळ उडाला. ३.३० वाजता ५० सिलिंडर आले. रुग्णवाहिकेच्या मदतीने २ तास ऑक्सिजन देण्यात आले. यादरम्यान,  एकापाठोपाठ एक ३० रुग्णांनी प्राण सोडले. 

हीरो: रुग्णालयातील डॉ. कफील सिलिंडरसाठी वणवण फिरले, आपल्या कारमधून डॉक्टर मित्रांकडून त्यांनी १२ सिलिंडर अाणले

या संकटात वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी बरीच पळापळ केली. रात्री २.०० वाजता इन्सेफेलायटिस वॉर्डाचे प्रभारी डॉ. कफील खान रुग्णालयात आले. सकाळी ७.०० वाजेपर्यंत अधिकारी, ऑक्सिजन पुरवठादारने फोन न उचलल्यामुळे ते कार काढून बाहेर पडले. खासगी रुग्णालयांना मदत मागितली आणि कारमधून १२ सिलिंडर आणले. कफील यांचा एक कर्मचारी सशस्त्र सुरक्षा दलाचे डीआयजीकडे गेला. त्यावर डीआयजींनी तत्काळ १० सिलिंडर दिले, सोबत एक ट्रकही दिला.

१० लाखांपेक्षा जास्त थकबाकी ठेवता येत नाही
पुष्पा सेल्सचे दीपांकर शर्मा यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, थकीत रक्कम ६८ लाख ५८  हजार ५९६ रुपये आहे. नियमानुसार जास्तीत जास्त १० लाख थकीत ठेवता येतात. आयनॉक्स कंपनीच्या प्लँटने ऑक्सिजन पुरवठ्यास नकार दिला होता. गुरुवारी सायंकाळी मृत्यूचे तांडव सुरू झाले. यामुळे व्यवस्थापनाने २२ लाख अदा करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी द्रवरूप ऑक्सिजनचे टँकर पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा टँकर पोहोचला नव्हता.
बातम्या आणखी आहेत...