आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३५ कुटुंबांनी अचानक गाव सोडल्याने खळबळ, वडिलोपार्जित गाव सोडून जंगलात स्थलांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - दक्षिण गोव्यात विशिष्ट जमातीच्या ३५ कुटुंबांनी अचानक वडिलोपार्जित गाव सोडल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनीही या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही कुटुंबे कर्नाटकलगत असलेल्या जंगलात स्थलांतरित झाली असल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत या कुटुंबांनी अचानक गाव सोडल्याने खळबळ माजल्यावर पोलिसही गोंधळून गेले होते. याची तत्काळ दखल घेत त्याची शहानिशा सुरू केली होती.

पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस पथकांनी या कुटुंबांचा माग काढत जंगल गाठले. ही कुटुंबे आता जंगलातच राहत असून शांत जीवन जगता यावे म्हणून आपण गाव सोडल्याचे या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले आहे.

झेलडम असे या गावाचे नाव असून एकामागे एक या आदिवासी जमातीच्या कुटुंबीयांची घरांना कुलूप दिसू लागल्याने गावकरीही काही दिवस गोंधळले होते. प्रभुदेसाईंनुसार, हे गावकरी बेपत्ता झालेले नसून स्थलांतरित झाले आहेत. या स्थलांतराची नेमकी कारणे काय आहेत याचा पोलिस शोध घेत असून अद्याप तरी यात गंभीर बाब उघडकीस आलेली नाही.

शाळेतून नाव काढले
स्थानिक लोकांनुसार, स्थलांतरित कुटुंबांनी आपल्या मुलांचे शाळेतील प्रवेशही काढ ून घेतले आहेत. दरम्यान, या प्रकरणी तपास करणारे पोलिस निरीक्षक प्रवीण गवस यांनी याबाबत काही बोलण्यास नकार दिला.