आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 38 People Died In Land Slide In Darjiling, 8 MIssing

दार्जिंलिंग : दरड कोसळून ३८ ठार, ८ जण बेपत्ता, लष्कर बचावकार्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिलीगुडी - दार्जिलिंग जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून ३८ जणांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता झाले. मंगळवारी रात्री जिल्ह्यातील तीन उपविभागांत मुसळधार पाऊस पडला.

दार्जिलिंगमधील २५ ठिकाणी दरडी कोसळल्या. कलीमपोंग आणि कुरसोंग उपविभागातील राष्ट्रीय महामार्ग १० आणि ५५ चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे या भागातील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि लष्कराच्या जवानांनी बचावकार्य हाती घेतले आहे. विविध दुर्घटनांमध्ये १५ जण जखमी झाले असून ८ जण बेपत्ता असल्याची माहिती एसएसबीच्या सूत्रांनी दिली. दार्जिलिंग पर्वत क्षेत्रात विविध ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री जावेद खान यांनी कोलकात्यात दिली. सीमा रस्ते संघटनेचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळाचा दौरा करणार आहेत.

३१ वर लोक अडकले
पावसामुळे कलिमपोंगमध्ये सात, तर सुकीपोखरीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती एसएसबीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितली. विविध भागात बचावकार्य सुरू असून नुकसानीची एकत्रित आकडेवारी मिळवली जात आहे. मोंगपोंग आणि सेवोह कालीबारी परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वर लोक अडकले आहेत.

मदतीसाठी अनेक संस्था पुढे
आपले परिस्थितीवर लक्ष असून मुर्शिदाबादमधील बैठकीनंतर तिथे जाणार असल्याचे टि्वट ममता बॅनर्जी यांनी केले आहे. गृहसचिव नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेल्याची माहिती त्यांनी दिली. लष्कराकडे मदत मागितली असून अनेक संस्था मदतीसाठी पुढे आल्या असल्याची माहिती उत्तर बंगाल विकास मंत्री गौतम देव यांनी दिली. दार्जिलिंगच्या तीन उपविभागांत एकूण २५ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १० चे नुकसान झाल्यामुळे कलिमपोंग, लावा, लोलेगाव आणि गरूबथानच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सिलीगुडी अाणि माटिगराला जोडणारा महामार्ग क्रमांक ५५ चे नुकसान झाले. या महामार्गावरील निबुजहोरा येथील पूल वाहून गेला आहे.