आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कंपन्या स्थापून शेअरचे भाव वाढवले अन् 38000 कोटींचा काळा पैसा केला पांढरा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/जोधपूर - जोधपूरमध्ये ब्यूटी पार्लरच्या छोट्याशा दुकानावर प्राप्तिकर विभागातील महासंचालकांच्या (तपास) पथकाच्या छाप्यांमुळे संपूर्ण देश थक्क झाला आहे. हा दुकानदारही कोलकात्यातून चालत असलेल्या पैनी टॅक्स आणि बनावट शेअर ट्रेडिंगच्या साखळीतील एक दुवा होता. त्याच्या पॅन क्रमांकावर एका कागदोपत्री असलेल्या कंपनीचे शेअर मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत होते, पण या कंपनीचा व्यवसाय काहीच नव्हता.
 
‘दिव्य मराठी’ने या प्रकरणाची संपूर्ण पडताळणी केली, सेबी आणि डीजी इंटेलिजन्सचा गोपनीय अहवाल पाहिला तेव्हा या सिंडिकेटचे २५ मास्टर माइंड आहेत, असे कळले. त्यांनी देशभरात ३८००० कोटी रुपये एवढा काळा पैसा पांढरा केला आहे. एकट्या राजस्थानमध्येच हा आकडा ३ हजार कोटी रुपये आहे. 

सिंडिकेटमध्ये अनिल खेमका, जगदीश पुरोहित, सज्जन केडिया, सावन जाजू आणि प्रवीण अग्रवाल यांची नावे आहेत. डीजी इंटेलिजन्स यांनीही सर्वांचा जबाब नोंदवून खटला सुरू केला आहे. १६० पानांचा हा अहवाल प्रधान आयुक्तांना पाठवला आहे. या गोरखधंद्यांत चार मोठ्या शेअर ब्रोकर्सचा वापर केला आहे. शेअरच्या खरेदी-विक्रीसाठी ते आवश्यक होते. त्यापैकी जोधपूरचे मूळ रहिवासी आनंद राठीची राठी सिक्युरिटीज ही कंपनीही त्यात आहे.
 
सेबी आणि डीजी इंटेलिजन्स यांनी २०१३-१४ आणि १४-१५ मध्ये प्रचंड चढ-उतार असणाऱ्या ८४ कंपन्यांचे शेअर तसेच २२ शेअर ब्रोकर्स याची चौकशी केली होती. त्यात देशभरातील ६४८११ जणांना फायदा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी बनावट कंपन्यांच्या शेअरची खरेदी-विक्री केली होती. या सिंडिकेटच्या कंपन्यांतून शेअर ट्रेडिंग करणाऱ्या राजस्थानच्या ७९५ लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी सुमारे ४०० जण जोधपूर आयुक्तालयातील आहेत.
 
जोधपूरचे प्राप्तिकर विभागाचे आयुक्त एस. के. सिंह म्हणाले की, गोपनीयतेमुळे नोटिसांची संख्या आणि नाव सांगणे योग्य नाही. एखाद्याने १० हजाराचे ट्रेडिंग केले आहे आणि त्याच्याकडे अतिरिक्त कर होत असेल तर तो वसूल करू. काही लोकांनी आयडीएसचा फायदा घेतला तर काहींनी घेतला नाही. ज्यांना लढाई लढायची आहे, त्यांच्याशी कर वसुलीची लढाई लढण्यास प्राप्तिकर विभागही सज्ज आहे. 
 
‘आयडीएस’मध्ये कर देणारे वाचणार :
३० सप्टेंबरपर्यंत चाललेल्या इन्कम डिक्लेरेशन स्कीममध्ये (आयडीएस) बहुतांश असे लोकच आहेत. डीजी इन्व्हेस्टिगेशनच्या डीव्हीडीद्वारे अशा लोकांना नोटीस तर दिली जाईल, पण जेव्हा ते आयडीसी प्रमाणपत्र सादर करतील तेव्हा त्यांच्याविरुद्धचा खटला मागे घेतला जाईल. इतर लोकांकडून कर, व्याज, दंड वसूल होईल आणि खटलाही सुरू राहील.
 
असा झाला गोरखधंदा
सर्वात आधी बनावट कंपन्यांची स्थापना
सिंडिकेटशी संबंधित सर्व २५ मास्टर माइंडनी सर्वात आधी देशभरात बनावट कंपन्या स्थापन केल्या किंवा बनावट कंपन्यांत व्यवहार केले. सेबी आणि डीजी इंटेलिजन्सच्या अहवालानुसार अशा ५२९० कंपन्या बनवल्या. त्यापैकी अनेक कंपन्या लिस्टेड होत्या. त्यांच्या माध्यमातून शेअरची खरेदी-विक्री झाली. येथूनच गोरखधंदा सुरू झाला.

शेअर ब्रोकर्सचा केला वापर
त्यांनी लोकांचे पॅन क्रमांक घेऊन पैनी शेअर (३ ते ५ रु. पर्यंतचे स्वस्त शेअर) बनवले. किमती वाढवण्यासाठी आनंद राठी सिक्युरिटीज, रॅलीगेयर, कोलकाता शेअर बाजार, एसएमसी या चार ब्रोकर्सचा वापर. राठी सिक्युरिटीजमधून १२०९, एसएमसीतून १३६२, रॅलीगेयरमधून ६६२, कोलकाता स्टॉक एक्स्चेंजमधून ६७८८ कोटींचा व्यवसाय.

शेअरच्या किमतीत ५०० रु. पर्यंत वाढ
त्यांनी एक वर्षात ३ ते ५ रुपयांच्या शेअरची किंमत ५०० रु. वर पोहोचवली. त्यासाठी ब्रोकर्सनी केएमसीचे नियमही तोडले आणि या सिंडिकेटला मदत केली. आपल्या ग्राहकांना असे शेअर प्रमोट केले की त्यामुळे बनावट कंपन्यांचे शेअर वेगाने वाढले. अशा प्रकारे १५७५ कोटी रु. रोख घेऊन त्यांचा ३८,००० कोटींचा व्यवहार केला.

सिंडिकेटच्या सदस्याने १०० रु. वर १० पैसे एवढ्या कमिशनवर काम केले. शेअर ब्रोकर्सचे २ % कमिशन. पॅन कार्ड देणाऱ्यांत १ % वाटले. हवाला व्यवहार केल्यावर ५-७ % खर्च केला. एकूण १०% खर्चात २०% पर्यंत लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाचवला.

असा उघड झाला हा गोरखधंदा
सिंडिकेटने शेअर्सच्या किमती वाढवून ३८००० कोटी रुपयांत विकले. नंतर सर्व शेअरचे दर घटवून ते पुन्हा ३ ते ५ रुपयांवर येऊन बंद केले. सेबीने त्यांना पकडले तेव्हा शेअर्सची खरेदीही या २५ सिंडिकेट सदस्यामार्फत झाल्याचे कळले. नंतर डीजी इंटेलिजन्सने चौकशी करून १६० पानांचा अहवाल सर्व प्रधान आयुक्तांना पाठवला. सेबीने सनराइज एशियन, सुरभी केमिकल, सारंग केमिकल, कर्मा इंडस्ट्रीज यांसारख्या ८४ कंपन्यांच्या शेअरची खरेदी-विक्री तपासली आणि अहवालात समाविष्ट केली. अहवालात दिलेल्या खेमकाच्या जबाबातही त्याने ६२८ कंपन्या कागदोपत्री चालवत असल्याची कबुली दिली. पुरोहितच्या २८५ तर प्रवीणच्या ८३७ बनावट कंपन्या होत्या.

कोलकात्याचा मास्टर माइंड अनिल खेमकाशी ‘दिव्य मराठी’ची बातचीत
{ सिंडिकेटने ३८ हजार कोटींचा काळा पैसा पांढरा केला का?
- होय, गेल्या दोन वर्षांपासून कराबाबत जे वातावरण आहे, त्यामुळे पर्याय नव्हता. कोणी घर खरेदी केली, व्याज  किंवा पिढीजात पैसा आला तर १ नंबरचा करण्याची दुसरी पद्धतही नाही.
 
{ या सर्व कागदोपत्री कंपन्या होत्या काय?
-खरे आहे, या सर्व कागदोपत्री कंपन्या होत्या. खरा व्यवहार तर होतच नव्हता. मीही कागदावरच १० कंपन्या बनवल्या होत्या.
 
{ डीजी इंटेलिजन्सच्या अहवालात ६२८ कंपन्या आहेत?
- ते हजार कंपन्या सांगतील. प्राप्तिकर विभागाचे लोक धमकी देऊन जबरदस्तीने लिहून घेतात. व्यापाऱ्याकडे दुसरा पर्याय नसतो. त्यांनी संपूर्ण कथाच लिहिली. 
 
{ तुमचे आणि शेअर ब्रोकरचे कमिशन किती व्हायचे?
-आम्ही तर १०० रुपयांवर १० पैसे कमिशनवर काम करत होतो. त्यात २ % शेअर ब्रोकरलाही मिळत होते. पण पूर्ण काम सिस्टीममध्ये झाले आहे, सिस्टीमच्या बाहेर काहीही नाही.

हे कोणी केले मला माहीत नाही
डीजी इंटेलिजन्सच्या या अहवालाची मला काहीच माहिती नाही. त्यात माझ्या कंपनीचे नाव आहे हे तुम्हीच सांगत आहात. आम्ही तर फक्त प्लॅटफाॅर्म आहोत, काळा पैसा कोणी पांढरा केला, मला माहीत नाही - आनंद राठी, आनंद राठी सिक्युरिटीज, मुंबई.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...