आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Killed, 8 Wounded In Latest Artillery Fire Fight Between Pakistan, India

पाकिस्तानचा गोळीबार, 2 जवान शहीद; भारताच्या प्रत्युत्तरात पाकचे 3 रेंजर्स ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू / श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी शुक्रवारी रात्री सुरू केलेला गोळीबार शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. त्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. एका महिलेचाही मृत्यू झाला. भारताने पाकिस्तानच्या कुरापतीला चोख प्रत्युत्तर दिले. त्यात तीन पाकिस्तानी रेंजर्स मारले गेल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मूच्या कठुआ परिसरातील तोरी देवी आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असतानाच तोरी देवी यांचा मृत्यू झाला. काश्मीरच्या तंगधारमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या गोळीबारात भारतीय चौकीला आग लागली. त्यामुळे दोन जवानांचा जळून मृत्यू झाला. त्यापैकी एकाचे नाव विजय जारंग, तर दुसर्‍याचे नाव सुरेश आहे. बीएसएफचे दोन जवानही जखमी झाले.

पाकिस्तानी लष्कराने भारताच्या १३ चौक्यांवर गोळीबार केल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. शिवाय सांबा आणि कठुआ सेक्टरमधील गावांना लक्ष्य करून उखळी तोफांचा मारा केला. त्यात किमान दहा जण जखमी झाले. घरांचीही मोठी पडझड झाली. अनेक जनावरेही मारली गेली. दरम्यान, भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात सियालकोट परिसरात एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.

घुसखोरांनापाक लष्कराचे कवच : बीएसएफ
बीएसएफचेमहासंचालक राकेश शर्मा यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री ९.३० वाजता पाकिस्तानी बाजूने सुरू झालेला गोळीबार शनिवारी पहाटे वाजेपर्यंत सुरू होता. भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकचा गोळीबार थांबला मात्र सकाळी पुन्हा सुरू झाला. पाकिस्तानी लष्कर घुसखोरांना कवच देण्यासाठी गोळीबार करत आहे. शुक्रवारी रात्रीही सांबा सेक्टरच्या चोरगली परिसरात ७-८ अतिरेकी दिसले. पाकिस्तानी रेंजर्स त्यांना भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात आहे.

वारंवार हारूनही शेपूट वाकडेच : गृहमंत्री
पाकिस्तानी गोळीबाराला चोख उत्तर देण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. भारताकडून वारंवार पराभूत होऊनही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. आमच्या वतीने संबंध सुधारण्याचे प्रयत्न होत असूनही पाकिस्तान युद्धबंदीचे वारंवार उल्लंघन का करत आहे, हेच समजत नसल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

चार दिवसांत पाकिस्तानी रेंजर्सचा खात्मा
पाकिस्तान मागील चार दिवसांत पाचवेळा युद्धबंदी मोडली आहे. त्यात बीएसएफचा एक आणि लष्कराचे दोन जवान मारले गेले. भारताच्या प्रत्युतरात रेंजर्सचा खात्मा झाला. दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात १३ लोकांचा मृत्यू झाला होता. ३२ हजार लोकांना घर सोडून जावे लागले होते.

२०१४ मध्ये युद्धबंदीचे सर्वाधिक उल्लंघनाचे प्रकार
२००३ मध्ये युद्धबंदी लागू झाल्यानंतरचा आजपर्यंतचा सर्वाधिक गोळीबार

सीमेलगतच्या गावांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
सातत्यानेगोळीबार सुरू असल्यामुळे सीमेला लागून असलेल्या २२ गावांतील सुमारे १४०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कठुआतील गावे तर पूर्ण रिकामी करण्यात आली आहेत. सांबाचे उपायुक्त मुबारक सिंह यांनी सांगितले की, परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. हिरानगरमध्ये मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत.

(फोटो : पाकिस्तानच्या गोळीबारात कठुआ क्षेत्रातील वयोवृद्ध महिला जखमी झाली)