आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्ल्यांविरुद्ध आणखी ४ अजामीनपात्र वॉरंट, दोन कोटींचे धनादेश झाले अनादरित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - नऊ हजार कोटींचे कर्ज डोक्यावर असताना देश सोडून पळालेले विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध येथील स्थानिक न्यायालयाने आणखी चार अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहेत. सुमारे २ कोटी रुपयांचे धनादेश वटले नसल्याप्रकरणी दाखल खटल्यात न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल हे वॉरंट काढण्यात आले आहेत.

किंगफिशर एअरलाइन्सचे अध्यक्ष असलेले मल्ल्या यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरुद्धही हे वॉरंट आहेत. ५०-५० लाख रुपयांच्या चार धनादेशांप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले. किंगफिशर एअरलाइन्स २०१२ मध्ये बंद झाली आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या कंपनीने धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयात ही तक्रार दाखल केली आहे. याशिवाय अन्य तीन कंपन्यांच्या अशाच तक्रारी आहेत.

विमानांच्या लिलावाची शक्यता
१७ बँकांची फसवणूक करून परदेशात पळालेले मल्ल्या यांच्या मालमत्तेचा लिलाव होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांचा सेवाकर बुडवल्याप्रकरणी किंगफिशरच्या जेट विमानाची विक्री करून वसुली होण्याची शक्यता आहे. मल्ल्या यांनी ८१२ कोटी रुपयांचा सेवाकर बुडवल्याचा आरोप असून हा कर वसूल करण्यासाठी त्यांच्या खासगी ‘एअरबस एसीजे ३१९' विमानासह इतर जेट विमानांचा लिलाव केला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.