आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 4 Students Arrested In Connection With Collage Student Ragging Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉलेज युवतीच्या रॅगिंगप्रकरणी लेक्चररसह 4 विद्यार्थिनी जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - रॅगिंगला कंटाळून फार्मसीची विद्यार्थिनी अनिता शर्मा हिने आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या सुसाइड नोटमध्ये उल्लेख असलेल्या चार विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांना पोलिसांनी अटक केली असून महाविद्यालयाने या सर्वांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने प्रत्येक महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक दल स्थापन करण्याचेही आदेश दिले आहेत.

येथे होशंगाबाद रोडवरील आरकेडीएफ महाविद्यालयातील फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिकणारी विद्यार्थिनी अनिता शर्मा हिने रॅगिंगला कंटाळून दोन दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या पत्रात रॅगिंग करणार्‍या चार वरिष्ठ विद्यार्थिनींची तसेच त्याची तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे केमिस्ट्रीचे प्राध्यापक मनीष गुप्ता यांचे नाव लिहिले होते. आई-वडील, भावाला लिहिलेल्या पत्रात तिने रॅगिंगच्या नावाखाली होणार्‍या त्रासाची करुण कहाणी मांडली होती. यामुळे मध्य प्रदेशात खळबळ उडाली होती. राज्य सरकार तसेच महिला आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली होती.

गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांनी अनिताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर पत्रात नावे असलेल्या आरोपींना अद्याप अटक का केली नाही, अशी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे विचारणा केली. तसेच सायंकाळी पाचपर्यंत सर्वांना अटक करण्याचे आदेश दिले. यानंतर गडबडीने सूत्रे हलली. पोलिसांनी चार विद्यार्थिनी दीप्ती सोळंकी, कृती गौड, चिनधी मगरे, दिव्यांशू शर्मा, प्रा. मनीश गुप्ता यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवत त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 22 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. महाविद्यालयानेही या सर्वांना निलंबित केले आहे.

महिला आयोगानेही घेतली दखल : राज्याच्या महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाविरोधातही गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.