आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूरनंतर दुसरी घटना: फर्रुखाबादमध्ये महिनाभरात 49 नवजात अर्भकांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशात गोरखपूरनंतर फर्रुखाबाद जिल्हा रुग्णालयात गेल्या एक महिन्यात ४९ नवजात मुलांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सोमवारी याप्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि लोहिया जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांची बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी अहवाल आल्यानंतर सरकारने ही कारवाई केली आहे. बहुतांश मुलांचा मृत्यू ऑक्सिजन आणि औषधांअभावी झाला, असे चौकशीत आढळले. या ४९ मुलांचा मृत्यू २१ जुलै ते २० ऑगस्टदरम्यान झाला होता. या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांसह इतर काही अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 
 
सरकारच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले की, मुलांच्या मृत्यूचे कारण समजावे यासाठी एक पथक पाठवून या प्रकरणाची चौकशी केली जाईल. २० जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान जिल्हा रुग्णालयात ४६८ मुलांचा जन्म झाला होता. त्यापैकी १९ मुलांचा जन्म होताच मृत्यू झाला होता. इतर ४४९ पैकी ६६ गंभीर मुलांना न्यू बॉर्न केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ६० मुले बरी झाली. इतर ६ मुलांना वाचवण्यात अपयश आले. त्याशिवाय १४५ मुलांना वेगवेगळ्या रुग्णालयांतून येथे रेफर करण्यात आले होते. त्यापैकी १२१ मुले उपचारानंतर बरी झाली.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते चौकशीचे आदेश  
जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ३० ऑगस्टला पथक स्थापन करून तीन दिवसांत अहवाल देण्यास सांगितले होते. या पथकात एसडीएम, शहर दंडाधिकारी आणि तहसीलदार यांचा समावेश होता. बहुतांश मुलांचा मृत्यू ऑक्सिजन आणि औषधे यांच्याअभावी झाला होता, असे चौकशीत आढळले. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यासह सर्व अधिकाऱ्यांची फसवणूक केली होती, असेही चौकशीत स्पष्ट झाले. शहर दंडाधिकारी आणि या प्रकरणातील चौकशी पथकाचे सदस्य जैनेंद्र जैन यांनी कोतवालीत एफआयआर दाखल केला आहे. 

गोरखपूरमध्ये झाला होता ३० मुलांसह ६० जणांचा मृत्यू 
बाबा राघव दास (बीआरडी) वैद्यकीय महाविद्यालयात ७ ऑगस्ट ते १२ ऑगस्टपर्यंत ३० मुलांसह ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने हे मृत्यू झाले, असा आरोप आहे. पुष्पा सेल्स नावाच्या कंपनीने थकबाकीमुळे ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा रोखला होता. कंपनीने म्हटले होते की, आम्ही १४ रिमाइंडर पाठवले, पण तरीही वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. या प्रकरणी बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजीव मिश्रा, डॉ. पूर्णिमा मिश्रा आणि डॉ. काफिल खान यांना अटक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...