आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Terrorists Killed In Gunbattle At Air Force Base In Pathankot

पठाणकोट हल्ला : सतर्कतेमुळे टळले देशाचे मोठे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट - पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अनपेक्षित मित्रभेटीनंतर खवळलेल्या पाकिस्तानमधील अतिरेकी गटांनी पठाणकोट येथील वायुदलाच्या तळावर नियोजनबद्ध हल्ला केला. मात्र अतिशय सतर्क असलेल्या भारतीय सुरक्षा दलाने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलाचे सहा जवान शहीद झाले असले तरी सुरक्षा दले सतर्क असल्यामुळेच वायुदलाच्या तळावर आतपर्यंत मुसंडी मारण्यात दहशतवादी अपयशी ठरले.

वायुदलाच्या तळावरील विमाने व हेलिकॉप्टर्स नष्ट करण्याची योजना करून दहशतवादी भारतात घुसले होते. त्यांचा हा उद्देश अजिबात सफल झाला नाही. इतकेच नव्हे तर वायुदलाच्या तळावरील सैनिकांच्या कुटुंबीयांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबाही पुरा झाला नाही.

भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली की दहशतवादी टोळ्या नेहमीच सक्रिय होतात. पाकिस्तानी लष्कर व पाक गुप्तचर यंत्रणांचे त्यांना पाठबळ असते. असा हल्ला झाला की दोन्ही देशांतील कडवे आक्रमक होतात व बोलणी थांबतात. हाच प्रकार या वेळीही होईल, अशी खात्री असल्याने भारताच्या सुरक्षा यंत्रणा गेले आठवडाभर अतिशय सतर्क होत्या.

गुप्तचर व सुरक्षा यंत्रणांच्या या सतर्कतेचा फायदा झाला
- गुरुवारी दहशतवादी पाकिस्तानमधून भारतात घुसले. पठाणकोटजवळ त्यांनी पोलिस अधीक्षकांची गाडी पळवली. तेव्हापासूनच भारताची सुरक्षा यंत्रणा त्यांच्या मागावर होती. दहशतवाद्यांचे दूरध्वनीवरील संभाषण पकडण्यात काल रात्री सुरक्षा यंत्रणांना यश आले. पाकिस्तानमधील आपल्या मार्गदर्शकांशी दहशतवादी बोलत होते. यानंतर दिल्ली व पंजाबमधील उच्चस्तरीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या.
- हवाई दल तळावर हल्ला होणार हे शुक्रवारी सायंकाळीच कळले होते. त्यानुसार सर्व यंत्रणा सज्ज होत्या. हवाई दल तळाचा परिसर विस्तीर्ण व तेथे दाट झाडी आहे. दूरध्वनी संभाषण पकडेपर्यंत दहशतवादी आत घुसले होते. ते विमाने व हेलिकॉप्टरपर्यंत जाणार हे लक्षात घेऊन त्यांना बाहेरील बाजूसच थोपविण्याची योजना होती.
- शुक्रवारपासूनच चोख बंदोबस्त लावून तपास सुरू झाला. सर्व दुकाने बंद केली. ही आणीबाणीची वेळ आहे,असे बीएसएफला कळवले होते.
- दिल्लीहून सूत्रे हलली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल स्वत: यामध्ये लक्ष घालीत होते. एनएसजी कमांडो रातोरात पठाणकोटला पोहोचले. याशिवाय लष्कराची मोठी फौज सज्ज करण्यात आली.
- दहशतवादी आत घुसल्याची माहिती फोन कॉलवरून लक्षात आली. दहशतवाद्यांना मिळालेल्या सूचनाही कळल्या. विमानातून टेहळणी सुरू झाली. थर्मल इमेजिंगद्वारे जंगलातील हालचाली टिपणे सुरू झाले. तरीही दहशतवाद्यांनी एका गार्डला मारलेच.

विमाने उडवण्याचे होते लक्ष्य
तळावरील टेक्निकल एरिया अतिशय महत्त्वाचा होता. त्यावर हल्ला होऊन त्याचे मोठे नुकसान झाले असते तर भारतीय सुरक्षा यंत्रणांची जगभर नाचक्की झाली असती. हवाई दलाचेही मोठे नुकसान झाले असते. विमाने उद््ध्वस्त करण्याचे लक्ष्य दहशतवाद्यांना दिलेले होते. भारताला हे आधीच कळल्यामुळे टेक्निकल एरिया व वायुदल कर्मचाऱ्यांनी निवासस्थानांच्या रक्षणाला प्राधान्य दिले व त्यामध्ये सुरक्षा यंत्रणा यशस्वी ठरल्या. पाकमधून दहशतवादी हल्ला करणार अशी माहिती नेहमीच हाती येते. पण ते अंदाज असतात. या वेळी पक्की माहिती हाती आली. हल्ला कोठून व कधी होणार, हल्ल्याचा उद्देश याची पक्की माहिती यंत्रणांना मिळाली. भारत बेसावध नव्हता ही या वेळची समाधान वाटावी अशी प्रगती आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा हल्ल्याशी संबंधित इतर फोटो...