आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 65 Year Old Fair In Tamora For The Mahatma Gandhi

तमोरामध्ये 65 वर्षांपासून महात्मा गांधींचे श्राद्ध आणि जत्राही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महासमुंद (छत्तीसगड) - महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला राज्यातील एका गावात 65 वर्षांपासून श्राद्ध करण्याची परंपरा सुरू आहे. गुरुवारीदेखील ही परंपरा पाळण्यात आली. यानिमित्ताने गावातील बुजुर्ग मंडळींनी मुंडण करून बापूंचे स्मरण केले. महासमुंद जिल्ह्यातील बागबाहरा तालुक्यातील तमोरामध्ये ही ऐतिहासिक परंपरा आहे. देशात ही एक अनोख्या प्रकारातील परंपरा आहे. बापूंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपूर्ण गावातील लोक एकत्र आले होते. त्यानंतर वैदिक पद्धतीने पूजाविधी पार पडले. त्यानंतर गांधी जत्रेला सुरुवात झाली. जत्रेत किमान चार ते पाच लाख रुपयांची उलाढाल होते. तमोरा तसे 160 उंब-यांचे गाव. लोकसंख्या 2 हजारांच्या जवळपास आहे. श्राद्धाच्या पंधरा दिवस अगोदरपासून गावात स्वच्छता करण्यात येते. घर-अंगणाला शेणामातीने सारवून घेतले जाते. घर, रस्ते, गल्ल्या आदींची साफसफाई केली जाते. जत्रेसाठी वर्गणीदेखील गोळा केली जाते. 1948 मध्ये गांधींची हत्या झाल्यानंतर या गावात 10 दिवसांपर्यंत चूल पेटली नव्हती. संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते. त्यानंतर दरवर्षी 30 जानेवारीला श्राद्ध करण्याची परंपरा सुरू झाली.


गांधी मंदिरात श्रद्धांजली
गुरुवारी ओडिशातील गांधी मंदिरात शेकडो लोकांनी बापूंच्या स्मृतीला अभिवादन केले. बापूंच्या पुतळ्यासमोर लोकांनी पुष्प अर्पण करून राष्ट्रपित्याला विविध गीतांमधून श्रद्धांजली अर्पण केली. माजी आमदार अभिमन्यू कुमार यांनी 1974 मध्ये भात्रा जिल्ह्यात हे मंदिर बांधले. परिसरातील लोक दररोज सकाळी मंदिरात एकत्र येऊन पुतळ्याची पूजा करतात.


बापूंवर 14 भाषांतून 108 गाणी
महात्मा गांधींवर 14 भाषांतून 108 गाणी असलेल्या अल्बमचे गुरुवारी लाँचिंग करण्यात आले. अल्बममध्ये देशाच्या विविध भागांतील कवी एकत्रित आले आहेत. त्यात काश्मिरी, सिंधी, उर्दूसह 143 भाषांचा समावेश आहे. वास्तविक हा प्रकल्प दोन दशके जुना आहे. ‘बापूगीतिका : साँग्ज फॉर द महात्मा’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. कल्पना पालखीवाला प्रकल्पाच्या प्रमुख आहेत. गांधींच्या योगदानाची महती विविध गाण्यांतून मांडण्यात आली आहे.