बरेली - शाळेच्या प्राचार्यांनी केलेल्या मारहाणीत एका लहानग्या विद्यार्थाला
आपला जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आला आहे. या मुलाचे वय अवघे 7 वर्ष असल्याचे सुत्रांनी सांगितले. भिंतीवर जोरात डोके आदळल्याने विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांपासून या विद्यार्थ्याच्या वडिलांनी शाळेची 4500 रूपये फीस न भरल्याने प्राचार्यांनी विद्यार्थ्याला मारहाण केली त्याचे डोके भिंतीवर आदळले. डोक्याला दुखापत झाल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यु झाल्याचा आरोप मुलाच्या कुटूंबीयांनी केला आहे.
दरम्यान, मुलाला झालेली मारहाण ही शुल्क न भरल्यामुळे नाही तर शाळेचा गृहपाठ न केल्याने करण्यात आल्याचे शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणी शाळेच्या प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आल्याचे बरेलीचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास पोलिस करत असून त्यानंतर यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.