आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालीपूजा भोवली: फटाके फोडल्यामुळे 700 बंगालींची दिवाळी तुरुंगात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- प्रतिबंधित आवाजाचे फटाके उडवणार्‍या 700 जणांना अटक करण्यात आली. कालीपूजेनिमित्त शनिवारी सायंकाळी हे फटाके उडवण्यात आले होते. पोलिसांनी पश्चिम बंगालच्या विविध भागांत अटकेची कारवाई केली. ठरावीक डेसिबल लिमिटपर्यंतचे फटाके उडवण्याची अट प्रशासनाने घातली होती. मात्र, चॉकलेट बॉम्बसारखे फटाके फोडून काहींनी प्रतिबंधित ध्वनीचे उल्लंघन केल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली.

प्रतिबंधित ध्वनिप्रकरणात 400 तर आक्षेपार्ह वर्तन करणार्‍या 331 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली. मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांमुळे ज्येष्ठ नागरिक व मुलांना त्रास होतो. प्रतिबंधित आवाजाचे फटाके विकणार्‍या स्टॉलधारकांविरुद्धच्या कारवाईत पोलिसांनी मोठा साठा जप्त केला आहे. दिवाळीमध्ये अप्रिय घटना घडू नये यासाठी विशेष कंट्रोल रूम सुरू करण्यात आली होती.

देशभरात प्रचंड उत्साहात दीपोत्सव
नवी दिल्ली- फटाक्यांची आतषबाजी, घरांची रोषणाई, दिव्यांची उजळण करीत देशभरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नागरिकांनी मित्र परिवार, आप्तांना मिठाई देऊन आनंद द्विगुणित केला. भारत-पाकिस्तान सीमेवर दोन्ही बाजूंच्या लष्कराने मिठाईचे आदान-प्रदान केले.

प्रत्यक्ष भेटीतून किंवा सोशल मीडिया तसेच एसएमएसच्या माध्यमातून नारिकांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. रावणाचा पराभव करून अयोध्येत परतलेल्या प्रभू र्शीरामाचा विजयदिन दिवाळीच्या रूपात साजरा केला जातो. राजधानी दिल्लीत नागरिकांनी घरे, दुकाने सजवली होती. महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. पंजाबमधील अमृतसरमध्ये हजारो नागरिक सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आले होते. विविध शहरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अटारी सीमेवर भारत-पाकिस्तानच्या जवानांनी दिवाळीनिमित्त एकमेकांना मिठाई दिली.