आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुमतासाठी मुदत मिळताच राजकीय घडामोडींना वेग, ९ बंडखोर आमदारांना नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/डेहराडून - बहुमत सिद्ध करण्यासाठी २८ मार्चपर्यंतची मुदत मिळताच उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवाल यांनी काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. तुमचे सदस्यत्व संपुष्टात का आणू नये, अशी विचारणा नोटिशीत करण्यात आली असून उत्तर देण्यासाठी २६ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. ही नोटीस ई-मेल द्वारे पाठवली असून सर्व बंडखोर आमदारांच्या घराबाहेरही चिटकवण्यात आली आहे.

दुसरीकडे, ३५ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते अजय भट्ट यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षांनी नोटीस जारी करण्याआधीच भाजपच्या २६ तर काँग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांनी अध्यक्षांच्या विरोधात विधानसभा सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. विधानसभेत काँग्रेस आमदारांनी विनियोग विधेयकाच्या विरोधात मत देऊन सरकार पाडण्याचे प्रयत्न केल्यानंतर राज्यपालांनी हरीश रावत यांना २८ मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाई करत बंडखोर मंत्री हरकसिंह रावत यांचे विधानसभेतील कार्यालय बंद केले. त्यांच्याकडील फायलींचीही पडताळणी करण्यात आली.

राहुल-जेटलींची परस्परांवर टीका
उत्तराखंड संकटावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी परस्परांवर टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, ‘बिहारमधील पराभवानंतर जनतेने निवडून दिलेले सरकार पैसे आणि ताकदीच्या बळावर खरेदी-विक्री करून पाडणे हे भाजपचे नवे मॉडेल आहे. आधी अरुणाचल आणि आता उत्तराखंड, आमची लोकशाही आणि राज्यघटनेवरील हल्ला हा मोदींच्या भाजपचा नवा चेहरा आहे. काँग्रेस पक्ष याविरोधात लोकशाही पद्धतीने लढेल.’
दुसरीकडे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, ‘उत्तराखंडमध्ये जे राजकीय संकट निर्माण झाले आहे, त्याचे कारण काँग्रेसमधील अंतर्विरोध हे आहे. तेथे एक जण मुख्यमंत्री होतो तर दुसरा सरकार पाडण्याचा प्रयत्न करतो. भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. विधानसभा अध्यक्ष नामंजूर विधेयक मंजूर झाल्याचे सांगत आहेत, ही विचित्र स्थिती आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथे काँग्रेसची स्थिती दुय्यम झाली आहे. त्या पक्षाला प्रादेशिक पक्षांसमोर दुय्यम स्थान घ्यावे लागत आहे. दुसरीकडे आसाममध्ये भाजपकडे आघाडीचे नेतृत्व आहे.’

आधी घोड्याची टांग मोडली, आता घोडेबाजार : रावत
भाजप राज्य सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, ते लोकशाहीची हत्या करत आहेत, असा आरोप करून उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत म्हणाले की, मोदी सरकार एकीकडे संघवादाची गोष्ट करते, पण दुसरीकडे राज्यांत विरोधी पक्षांच्या सरकारवर निशाणा साधत आहे. हे एकप्रकारचे ‘एनकाउंटर’च आहे. आधी घोड्याची टांग तोडली आणि आता घोडेबाजार करून उत्तराखंडची टांग तोडत आहे. मोदीजी, तुम्ही लोकशाहीच्या हत्येची होळी खेळू नका, रंगांची होळी खेळा, असे आवाहनही त्यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...