आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 96 yr old Enrols For PG In Nalanda Open University

सुनेचा आग्रह, पाटण्याच्या राजकुमार वैश्य यांनी दिली ९७ व्या वर्षी एमएची परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - राजकुमार वैश्य, वय ९७ वर्षे. विषय - अर्थशास्त्र, अभ्यासक्रम - एमए प्रथम वर्ष, नालंदा मुक्त विद्यापीठ. राजकुमारांच्या जिद्दीपुढे वृद्धत्वही तोकडे आहे. या वयात जेव्हा माणसाची नजरही त्याची साथ सोडते, राजकुमार परीक्षा देत आहेत. तेही पूर्ण तीन तास बसून. राजकुमार यांनी पहिल्या पेपरमध्ये २३ पाने लिहिली. एमए करण्यासाठी त्यांना त्यांच्या सुनबाईने प्रेरित केले. पहिल्या दिवशी परीक्षा हॉलमध्ये त्यांना पाहताच विद्यार्थी, शिक्षक चकित झाले.

गेल्या वर्षी सून डॉ. भारती एस. कुमार यांनी राजकुमार यांचे अर्थशास्त्रातील स्वारस्य बघता त्यांना त्यात एमए करण्याचा आग्रह केला. त्यांनीही तो मान्य केला. पण या वयात कुठे प्रवेश मिळेल, असा प्रश्न समोर आला. त्यांनी नालंदाच्या मुक्त विद्यापीठात अर्ज भरला. आता परीक्षा सुरू झालेल्या आहेत. राजकुमार दुसऱ्या पेपरची तयारी करत आहेत. सून डॉ. भारती म्हणाल्या, मी २०१५ मध्ये सहजच बाबुजींना म्हटले की, तुम्ही एमएमध्ये पदव्युत्तर डिग्री का करत नाहीत? ते वर्तमानपत्र वाचत होते. ते गांभीर्याने विचार करू लागले. वयाबाबत काहीशी चिंता होती, पण कुटुंबाने पाठिंबा दिला. यानंतर प्रवेश कुठे, कसा घ्यावा, याची चर्चा सुरू झाली. नालंदा मुक्त विद्यापीठ ठरल्यानंतर तेथील कुलसचिव डाॅ.एस.पी. सिन्हा यांनी स्वत: घरी येऊन नामांकन प्रक्रिया पूर्ण केली. ७० वर्षांनी पुन्हा अभ्यास करण्याबाबत बाबुजी खूप उत्साहित झाले. विद्यापीठाकडून पुस्तकेही मिळाली. यानंतर नियमित दिनचर्येतून अभ्यासासाठी वेळ काढणे सुरू केले. ते रोज तीन-चार तास अभ्यास करतात. यासाठी त्यांनी आपली आवडती टीव्ही मालिकाही पाहणे बंद केले. राजकुमार म्हणाले, रिकामा बसण्यापेक्षा काहीतरी करावे हे चांगलेच होते. संख्याशास्त्राचा पेपर जर अवघड होता. यासाठी मी संशाेधक विद्यार्थ्याची मदत घेतली. अर्थशास्त्रात मी पास होईलच, असा मला विश्वास होता.
१९३८ मध्ये केले होते बीए
राजकुमार मूळचे यूपीतील बरेली जिल्ह्याचे निवासी आहेत. त्यांचा जन्म १ एप्रिल १९२० राेजी झाला. ते बरेलीच्या सरकारी शाळेतून १९३४ मध्ये दहावी पास झाले. १९३८ मध्ये आग्रा विद्यापीठातून बीएम आणि १९४० मध्ये एलएलबी पास केले. ते सध्या पाटण्यात मुलगा प्राे. संतोषसोबत राहतात.