आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 Terrorist Killed, One Surrenders After Attack On Police, 275 Militants Present At J&K

Kashmir: अमरनाथ यात्रेपूर्वी ५ दिवस आधी तिसरी चकमक, लष्कर-ए-तोयबाचे २ अतिरेकी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- काश्मीरमधील कुलगाम भागात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन अतिरेकी ठार झाले. तर, एका अतिरेक्याने शस्त्रासह शरणागती पत्करली. मृतांमध्ये लष्करचा स्वयंघोषित विभागीय म्होरक्या शकूर दार याचा समावेश आहे. सूत्रांनुसार, २८ जूनला अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी सुरक्षा दलांनी जम्मू-श्रीनगर हायवेवर यात्रेकरू सुरक्षित राहावेत म्हणून कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, काश्मीर खोऱ्यात सध्या २५० ते २७५ अतिरेकी सक्रिय असल्याचे सुरक्षा दलाने म्हटले आहे. 


पोलिसांनुसार, कुलगाम जिल्ह्यात म्योइमूह भागात चेद्दरबन गावात अतिरेकी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलास मिळाली. त्यानुसार जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने लष्कराचे जवान व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या मदतीने एका घराला वेढा घातला. प्रारंभी अतिरेक्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरक्षा दलाने धडक कारवाई सुरू केली. यात शकूरसह दोन अतिरेकी मारले गेले. दुसरा अतिरेकी पाकिस्तानी असून त्याचे नाव हैदर आहे. तिसऱ्याने मात्र, शरणागती पत्करली. चकमक सुरू असताना स्थानिक युवकांनी सुरक्षा दलांविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यांना हुसकावण्यासाठी जवानांना बळाचा वापर करावा लागला. 


दार याच्यावर हत्यांचे गुन्हे : चकमकीत मारल्या गेलेल्या शकूर दार याच्यावर द. काश्मीरमधील अनेक पोलिस ठाण्यांत सामान्य नागरिकांच्या हत्येचे गुन्हे नोंद होते. कुलगामच्या सोपट टंगपोरा गावातील रहिवासी असलेला दार 'लष्कर'चा विभागीय प्रमुख म्हणून काम करत होता. दरम्यान, चकमक स्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे व काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. 


हायवेजवळ चार दिवसांत तिसरी चकमक 
नियंत्रण रेषेवर २७० अतिरेकी : काश्मीर खोऱ्यात सुमारे २७५ अतिरेकी सक्रिय आहेत. तर, नियंत्रण रेषेवर भारतात घुसखोरी करण्यासाठी सुमारे २७० अतिरेकी दडून बसले आहेत. श्रीनगरमध्ये तैनात कमांडर लेफ्ट. जन. ए. के. भट्ट यांनी सांगितले, खोऱ्यात २५०-२७५ अतिरेकी सक्रिय आहेत. नियंत्रण रेषेवर २५-३० गट करून सुमारे २७० अतिरेकी घुसखोरीसाठी शस्त्रसज्ज बसले आहेत. 


सूत्रांनुसार, अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रामार्गाच्या परिसरातून अतिरेक्यांचा नायनाट करण्यासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. चार दिवसांत हायवेच्या जवळ तीन चकमकी झाल्या आहेत. २० जूनला त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांना ठार मारण्यात आले होते. २२ जूनला अनंतनागमध्ये आयएस-जेकेचा स्वयंघोषित म्होरक्या दाऊद अहमद सोफीसह चार अतिरेकी मारले गेले होते. रविवारची चकमक याच कारवाईचा भाग होता. 

बातम्या आणखी आहेत...