आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता अभियानाला दिले 45 लाख; घटस्फोटानंतर मिळालेली रक्कम दिली दान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- जम्मूच्या डॉक्टर मेघा महाजन यांनी ठरवले असते तर त्या स्वत:चा मोठा दवाखाना थाटू शकल्या असत्या. त्यांच्याकडे तब्बल ४५ लाख रुपये एवढी रक्कम होती. पण त्या आता एखाद्या रुग्णालयात काम मिळते का याचा शोध घेत आहेत. त्यांच्याकडे जी मोठी रक्कम होती ती त्यांनी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला दान दिली आहे. आपला घटस्फोट झाला असला तरी इतर महिलांचा सन्मान कायम राहावा हा त्यामागील उद्देश होता.


डॉक्टर मेघा यांचे लग्न २०११ मध्ये दिल्लीत झाले होते. लग्नानंतर काही काळातच पतीशी वाद सुरू झाला. एक वर्षानंतर त्या जम्मू येथे आपल्या माहेरी आल्या. न्यायालयात पाच वर्षे घटस्फोटाचे प्रकरण चालले. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यायालयाने अंतिम निकाल दिला. न्यायालयाने तडजोडीची रक्कम म्हणून मेघा यांना ४५ लाख रुपये देण्यास सांगितले. पण मेघाला पैशांची प्रचंड लालूच आहे, त्यामुळेच ती तडजोडीची रक्कम म्हणून एवढी मोठी रक्कम मागत आहे, असा युक्तिवाद त्यांच्या सासरच्या मंडळींनी न्यायालयात केला. त्यामुळेच मेघा यांनी ही सर्व रक्कम दान देण्याचे ठरवले. पण ही रक्कम देशाच्या उपयोगी पडावी, तसेच घटस्फोटाच्या वेळी पालनपोषणासाठी रक्कम मागणाऱ्या महिलांना लालची म्हणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर द्यायचे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची निवड केली आणि संपूर्ण रक्कम स्वच्छ भारत निधीत हस्तांतरित केली. रक्कम मिळाल्याचे पत्र त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडूनही मिळाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून डॉक्टर मेघा हरिद्वारच्या दुघाधारी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काम करत होत्या.

बातम्या आणखी आहेत...