आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tearful Karnataka CM On Coalition With Congress, I Am Like Shiva Who Drank Poison

आघाडी सरकारचे दु:ख गिळतोय; कुमारस्वामींना सभेत रडू कोसळले; राजकीय नाट्यात मुख्यमंत्री भावुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तसंस्था
बंगळुरू- कर्नाटकात सत्तेत असलेल्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारमध्ये सारे काही अालबेल नाही हे वास्तव शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या अश्रूतून समोर आले. आघाडी सरकार चालवतानाची कसरत आणि त्याची बोचणी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या इतकी जिव्हारी लागली आहे की त्यांना एका जाहीर सभेत व्यासपीठावरच रडू कोसळले. रडतच ते म्हणाले, 'जगाला वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी जसे विषप्राशन केले तसेच आघाडी सरकारचे दु:ख मी गिळत आहे.' 


जेडीएस कार्यकर्त्यांच्या एका कार्यक्रमात कुमारस्वामी अत्यंत भावुक झाले. ते म्हणाले, 'तुमचा मोठा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून तुम्ही खूप आनंदी असाल. परंतु मी आनंदी नाही. आघाडी सरकारचे दु:ख मी जाणतो. मी विषकंठ (भगवान शंकर) होऊन या सरकारचे दु:ख गिळले आहे.' मुख्यमंत्र्यांनाच रडू कोसळल्याचे पाहून समोरच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कुमारस्वामींना आपला पाठिंबा दर्शवला. 


भाजपला सत्ता मिळू नये म्हणून झाली आघाडी 
विधानसभेसाठी १२ मे रोजी मतदान झाले. मतमोजणीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. प्रचारात जेडीएस व काँग्रेस परस्परांवर तुटून पडले होते. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रिपद देऊ केले. 


काँग्रेस : राज्याचे मुख्यमंत्री खुश तरच आम्ही सारे खुश! 
काँग्रेस नेते व कर्नाटकचे उपमुख्यमंंत्री जी. परमेश्वर यांनी कुमारस्वामी यांच्या वक्तव्याला फार महत्त्व न देता मुख्यमंत्री असे बोलूच कसे शकतात, असा प्रतिसवाल केला. मुख्यमंत्री आनंदी असतील तरच आम्ही सारे आनंदी राहू, असे ते म्हणाले. 


भाजप : आता राहुल भाजपच्या राज्यात भय असल्याचे सांगणार तरी नाहीत 
कुमारस्वामींच्या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'आशा आहे की राहुल गांधी आता भाजपच्या राज्यात भयाचे सावट आहे आणि आम्हीच कुमारस्वामींना सत्तेचे विष प्राशन करण्यास भाग पाडले,' असे ट्विट तरी करणार नाहीत. 


एका महिन्यात सूर बदलले
गेल्या १६ जून रोजी एका कार्यक्रमात कुमारस्वामी म्हणाले होते, सरकार उत्तम चालले आहे. किमान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी चिंता नाही. हे आघाडी सरकार स्थिर राहील. काही दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना कुमारस्वामी यांनी ३४ हजार रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. मात्र, एवढा पैसा आणणार कुठून हे मात्र ते सांगू शकत नव्हते. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, कुमारस्वामी यांचा तो व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...