Home | National | Other State | Amarnath Yatra starts only after weather forecast by Kashmir's 'Weatherman'

काश्मीरच्या ‘वेदरमॅन’ने हवामानाचा अंदाज वर्तवल्यानंतरच सुरू हाेते अमरनाथ यात्रा

उपमिता वाजपेयी | Update - Aug 02, 2018, 05:56 AM IST

सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेसाठी पहाटे चार वाजता पहलगाममधून पहिला जथ्था निघतो.

  • Amarnath Yatra starts only after weather forecast by Kashmir's 'Weatherman'

    श्रीनगर- सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेसाठी पहाटे चार वाजता पहलगाममधून पहिला जथ्था निघतो. पण यात्रेवर हवामानातील बदलाचा परिणाम होण्याची शक्यता असते. यात्रेच्या मार्गात अडथळा आहे किंवा नाही हे सांगण्याची जबाबदारी काश्मीरमधील ‘वेदरमॅन’ सोनम लोटस यांच्यावर आहे. लोटस दरदिवशी पहाटे ३.३० वाजता उठून हवामानाशी निगडित अचूक माहितीची जुळवाजुळव करतात आणि यात्रेकरूंच्या बेस कॅम्पपर्यंत ती माहिती पोहोचवली जाते. त्यानंतर ४ वाजता यात्रेचा कार्यक्रम निश्चित होतो. काश्मीरचे हवामान कसे आहे हे लोटस यांच्यापेक्षा चांगले कोणी जाणू शकत नाही. लोक त्यांच्यावर इतका विश्वास ठेवतात की त्यांना संताचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचमुळे लोक त्यांना ‘पीर लोटस’ असे संबोधतात. परंतु वास्तवात लोटस हे पीर नसून हवामान विभागाचे संचालक आहेत. मागील १० वर्षांपासून ते या पदावर कार्यरत आहेत.


    लोटस यांचा जन्म लडाखमध्ये झाला. त्यांना याच आठवड्यात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून सर्वोत्तम कर्मचारी म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराच्या रूपात मिळालेली रोख रक्कम त्यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील तीन आरोग्य क्षेत्रांतील संस्थांना आणि आपल्या टीममध्ये वितरित केली. सर्वांना प्रत्येकी १० हजार रुपये मिळाले. १० हजार रुपयांत जीवन बदलत नाही, पण एखाद्या व्यक्तीला चांगले काही तरी करण्याची प्रेरणा अवश्य मिळते, असे ते म्हणतात. २००५ मध्ये सोनम लोटस केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले व नंतर अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली.


    विमानाचे तिकीट बुक करायचे असेल किंवा घरात लग्नाची तारीख काढायची असो, सर्व जण लोटस यांच्याकडून हवामानाचा अंदाज जाणून घेतात, नंतर पुढील नियोजन केले जाते. त्यांचे मूळ गाव असलेल्या जंस्कार खोऱ्यातील लोक तर याक पहाडांमध्ये हरवल्यानंतर लोटस यांच्याकडून हवामानाचा अंदाज घेऊन त्याला शोधण्यासाठी निघतात. २०१४ मध्ये पुराच्या आधी किती पाऊस होणार आहे याचा अंदाज त्यांना आला होता. परंतु इतका मोठा पूर येईल, याबद्दल त्यांनाही खात्री नव्हती. त्या पुरानंतर म्हणजेच २०१५ मध्ये श्रीनगरमध्ये रडार उभारण्यात आले. आता एक महिना आधी ५०%, एक आठवड्यापूर्वी ८०%, दोन दिवसांपूर्वी ९५% आणि एक दिवसापूर्वी १००% अंदाज वर्तवतात. आणखी अचूक माहिती मिळावी म्हणून लवकरच जम्मू आणि लडाखमध्येही श्रीनगरप्रमाणे रडार लावण्यात येणार आहे. स्थानिक लोक सोनम यांना खूप पसंत करतात. शालेय विद्यार्थी जेव्हा सेल्फी काढण्यासाठी आग्रह करतात तेव्हा आपण सलमान खान असल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले.

Trending