आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे बंगालमध्ये तीन महिन्यांत दुसऱ्यांदा अल्पसंख्याक संमेलन, देशात मतपेढीचे राजकारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीनंतर नव्या वर्षात राजकीय पक्ष २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि २०१८ मध्ये होणाऱ्या ८ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजप तीन तलाक आणि अल्पसंख्याक संमेलनामार्फत मुस्लिम मतपेढीत फूट पाडण्याच्या सूत्रावर, तर काँग्रेस हिंदुत्वविरोधी प्रतिमा बदलण्याची योजना प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी भाजपने कोलकात्याच्या मो. अली पार्कमध्ये अल्पसंख्याक संमेलन घेतले. त्यात सुमारे १५ हजार मुस्लिम सहभागी झाले. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी अल्पसंख्याकांसाठी ६ वर्षांत काहीही केले नाही. भाजपचे राज्यात ३ महिन्यांत हे दुसरे अल्पसंख्याक संमेलन आहे.  

 

भाजप-काँग्रेसमध्ये कर्नाटकात ध्रुवीकरणाचे सुरू झाले आहे. बुधवारी कर्नाटकात अमित शहांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना हिंदूविरोधी, तर सिद्धरामय्यांनी भाजप व संघाला कट्टरवादी म्हटले होते. या वर्षी कर्नाटक, मेघालय, त्रिपुरा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, नागालँड, मिझोराम निवडणूक आहे.

 

पूर्व, पश्चिम, दक्षिणेत ध्रुवीकरण व प्रतिमा बदलाचे राजकारण  

गुजरात: काँग्रेस १४८ राम मंदिरांत पूजा किट देणार

> काँग्रेस राहुल गांधी यांच्या गुजरात सूत्राद्वारे २०१९ पर्यंत हिंदूविरोधी प्रतिमेतून बाहेर पडणार आहे. काँग्रेस राज्यातील १४८ राम मंदिरांत पूजा किट वाटणार आहे. पक्षाने त्यासाठी ‘श्रीराम सूर्योदय संध्या आरती समिती’ स्थापन केली आहे. कार्यकर्ते मंदिरांत जाऊन सकाळ-संध्याकाळ आरती करतील.  

 

कारण: काँग्रेस राहुलची मंदिर रणनीती कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या निवडणुकीत पुढे नेऊ इच्छिते. कारण ही हिंदूबहुल राज्ये आहेत. 

 

प. बंगाल: भाजपचे ३०% मुस्लिमांवर लक्ष  

> भाजपला तीन तलाकच्या मुद्द्यामुळे उ.प्र. निवडणुकीत मुस्लिम जागांवर फायदा झाला. भाजप हा फॉर्म्युला बंगालमध्ये अल्पसंख्याक संमेलनाद्वारे पुढे नेत आहे. भाजपने राज्यात २०१९ ची आणि यंदाच्या पंचायत निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. जागा वाढाव्यात हा हेतू. सध्या भाजपचे २ खासदार आहेत.  

कारण: प.बंगालमध्ये ३०% मुस्लिम मतदार आहेत. त्यांची २९४ पैकी १०० जागांवर आणि लोकसभेच्या ४२ पैकी १०-१२ जागांवर महत्त्वाची भूमिका आहे.  

 

कर्नाटक: भाजप-काँग्रेसची नजर ८५% मतदारांवर

काही दिवसांपासून सिद्धरामय्या स्वत:ला सतत हिंदू नेता म्हणत आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी स्वत:ला १००% हिंदू म्हटले होते. ते म्हणाले होती की माझे नाव काय? माझे नाव सिद्ध-रामा. भाजपचेच लोक हिंदू आहेत असे नाही, मीही हिंदू आहे. मोदींनी नोव्हेंबरमध्ये शिव मंदिरात दर्शन घेऊन प्रचार सुरू केला होता.  

कारण : मार्चमध्ये विधानसभा निवडणूक.८५% मतदार हिंदू आहेत. त्यात २०% लिंगायत, ब्राह्मण. ते भगवान शिवाला मानतात.

 

तृणमूल बंगालमध्ये ब्राह्मणांना गीता वाटत आहे  

 

> मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप होणाऱ्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही आता राहुल गांधींप्रमाणे हिंदुत्वाचा फॉर्म्युला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच ममतांचे जवळचे सहकारी अणुव्रत मंडल यांनी पक्षातर्फे बीरभूमी जिल्ह्यात ब्राह्मण संमेलनात आठ हजार पुरोहितांना गीता भेट दिली होती. मीही हिंदू आहे, असे स्वत: ममताही म्हणाल्या आहेत.  

कारण : राज्यातील सांप्रदायिक वादात भाजप ममतांवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करत आहे. विश्लेषकांच्या मते त्यामुळे हिंदू मतदार ममतांपासून दूर जाऊ शकतात. ममता हिंदुत्वावर लक्ष केंद्रित करत आहेत.  

 

> तृणमूलमधून भाजपत आलेले मुकुल रॉय म्हणाले की, ममतांचा तीन तलाक कायद्याला विरोध योग्य नाही. तिकडे, संमेलनात तीन तलाकवर याचिका दाखल करणाऱ्या इशरत जहाँचेही भाषण झाले.  

बातम्या आणखी आहेत...