आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलपूरमध्ये रविवारी होणार योगी तसेच सपा-बसपची अग्निपरीक्षा;राजकीय प्रतिष्ठा पणाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद- फुलपूर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची कर्मभूमी.  याच फुलपूरमध्ये मतदार रविवारी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदार योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या विकासाच्या आश्वासनावर जनतेचा विश्वास असेल की,  गेल्या २५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या सपा-बसपच्या धोरणावर भरवसा ठेवणार, याचा निर्णय रविवारी  देतील.  


सध्या तरी राज्यात ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी सातपासून मतदानास सुरुवात होईल. सायंकाळी ५ पर्यंत या निवडणुकीच्या मैदानात भाजपसह काँग्रेस आणि सपासह एकूण २२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सुमारे १९ लाख ६३ हजार मतदार आज एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराचे भवितव्य ठरवतील. यामध्ये १०.७९ लाख पुरुष मतदार असून, ८.८४ लाख स्त्री मतदार आहेत. फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांत २१५५ बूथवर मतदान होत आहे. मतमोजणी १४ मार्च रोजी होत आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. देशाचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. 

फुलपूर : पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मतदारसंघ  
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर १९६४ मध्ये फुलपूर मतदारसंघात पहिली पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या विजयालक्ष्मी पंडित विजयी झाल्या होत्या. विजयालक्ष्मी पंडित यांची १९६९ मध्ये संयुक्त राष्ट्रात प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा पोटनिवडणूक झाली. तेव्हाही काँग्रेसचे केशव देव मालवीय यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. परंतु संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार जनेश्वर मिश्रा यांनी त्यांना पराभूत केले होते.

 

गोरखपूर, फुलपूर लोकसभेसाठी कडकोट बंदोबस्त तैनात

उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेची ठरलेल्या गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानासाठी मतदान अधिकारी मतदान केंद्रावर शनिवारी सायंकाळी दाखल झाले. गोरखपूर मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने ही जागा रिक्त जागी झाली होती. तर फुलपूर मतदारसंघाचे खासदार केशवप्रसाद मौर्य यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने तेथेही रविवारी मतदान होत आहे.  या दोन्ही ठिकाणी १३ हजार निमलष्करी दलाचे जवान तसेच पोलिसांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी सहा मतदान केंद्रावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. संवेदनक्षम मतदान केंद्रावर निमलष्करी दल व पीएसीचे जवान तैनात ठेवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...