आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात विधानसभेत कॉग्रेस आमदाराने भाजप आमदाराला माइक-बेल्टने मारले; 2 आमदार 3 वर्षांसाठी निलंबित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- गुजरात विधानसभेत बुधवारी प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेस व भाजप आमदारांत शिवीगाळ आणि गुद्दागुद्दी झाली. ध्वनिक्षेपकांची तोडफोड करण्यात आली. यावरून विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी काँग्रेसचे दोन आमदार प्रदीप दुधात आणि अंबरीश डेर यांना तीन वर्षांसाठी तसेच बलदेव ठाकोर यांना एका वर्षासाठी निलंबित केले.  


उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी भाजप आमदार जगदीश पांचाळ यांना ध्वनिक्षेपकाने मारहाण करणारे काँग्रेसचे आमदार प्रदीप दुधात (अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत म्हणजे २८ मार्चपर्यंत आधीच निलंबित ) आणि विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर उभे राहून अपशब्द उच्चारत धाव घेणाऱ्या काँग्रेस आमदार अंबरीश डेर (दिवसभरासाठी आधीच निलंबित) यांना प्रत्येकी तीन-तीन वर्षांसाठी, नंतर भाजप अामदारांना धमकावल्यावरून काँग्रेस आमदार बलदेव ठाकोर यांना एका वर्षासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला. हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला.   


काँग्रेस-भाजप प्रदेशाध्यक्षांत आरोप-प्रत्यारोप  : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जितू वाघाणी म्हणाले,  काँग्रेसने सभागृहाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. अामदारांचे निलंबन करण्याच्या निर्णयासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांचे अाभार मानले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोळंकी यांनी हा निर्णय लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले.  


प्रश्नोत्तराच्या तासात स्वयंघोषित संत आसारामबापू यांच्या अाश्रमात काही वर्षांपूर्वी दोन मुलांचा कथित नरबळी देण्यासंबंधातील अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यासंदर्भात अामदार दुधात यांनी प्रश्न विचारला. तेव्हा अामदार नितीन पटेल यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. याच दरम्यान, काँग्रेस आमदार विक्रम माडम यांनी अध्यक्षांना उद्देशून काही सांगण्याचा प्रयत्न केला. नेमका याच वेळी गोंधळ उडाला. त्यानंतर डेर यांनी अध्यक्षांवर आरोपांची सरबत्ती सुरू केली. आमदार दुधात यांनी ध्वनिक्षेपक तोडला आणि आमदार पांचाळ यांना फेकून मारला. अर्थात तो वार पांचाळ यांनी चुकवला.  


 गाेंधळात  आमदार डेर अध्यक्षांच्या आसनासमोर गेले आणि मोठमोठ्याने काही बोलू लागले. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना धरले. अध्यक्षांनी आमदार माडम यांचे सदस्यत्व सभागृहाची कारवाई संपेपर्यंत स्थगित केले. त्यानंतर सभागृहाचे कामकाजही तहकूब  करण्यात आले.

 

काँग्रेस आमदारांचा सभात्याग  
त्रिवेदी म्हणाले, सत्ताधारी पक्षाने शिक्षेसाठी मागणी करण्यात दिलदारपणा दाखवला आहे. आपण या सदस्यांना ५ वर्षांसाठी निलंबित करावे या मताचे होतो. अध्यक्षांच्या या निर्णयास विरोध दर्शवत काँग्रेस अामदारांनी सभात्याग केला. दुधात यांना शिवीगाळ करणारे आणि काँग्रेस आमदारांना धमकावणारे भाजपचे आमदार जगदीश पांचाळ व हर्ष संघवी यांनाही तीन -तीन वर्षांसाठी निलंबित करावे, अशी काँग्रेस आमदारांची मागणी होती. तर पांचाळ म्हणाले, आपण शिवीगाळ केल्याचे काँग्रेसने सिद्ध करावे, आपण आमदारकी सोडण्यास तयार आहोत.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...