आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय पालिकेत दलितांना प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे अधिकार संपवले जात आहेत; भाजप खासदारांचे मोदींना पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार डॉ. यशवंत सिंह यांनी पदोन्नतीतील आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली. - Divya Marathi
खासदार डॉ. यशवंत सिंह यांनी पदोन्नतीतील आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली.

लखनऊ - देशभरात दलितांचा मोदी सरकारविरोधातील रोष वाढत असताना उत्तर प्रदेशातील भाजप खासदारांची नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता नगीना येथील खासदार डॉ. यशवंत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. 2 एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात खासदार डॉ. सिंह यांनी न्याय पालिकेत दलितांचे प्रतिनिधित्व करणारे कोणी नसल्यामुळे आमच्याविरोधात नवे-नवे निर्णय येत असून, दलितांचे अधिकार संपवले जात असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसातील हे भाजपच्या दलित खासदाराने पंतप्रधानांना लिहिलेले हे तिसरे पत्र आहे. रॉबर्टसगंज येथील खासदार छोटेलाल खरवार, इटावाचे खासदार अशोक दोहरे यांनीही दलितांच्या मुद्द्यावरुन मोदींना पत्र लिहिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रॉसिटी अॅक्ट कमकूवत झाल्याचा सांगत 2 एप्रिल रोजी देशभरात बंद पुकारण्यात आला होता, त्यानंतर राज्यात दलितांवर अत्याचार वाढल्याचे खासदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

 

पदोन्नतीतील आरक्षणासह खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करा -खासदार डॉ. यशवंत सिंह 
- उत्तर प्रदेशातील नगीना येथील खासदार डॉ. यशवंत सिंह यांनी पंतप्रधानांना पदोन्नतीतील आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आहे. पत्रात ते म्हणाले, 'मी खासदार म्हणून निवडून आलो तेव्हा तुमच्याकडे पदोन्नतीतील आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्याची मागणी केली होती. संघटनेचीही हिच मागणी आहे. आता सरकारला 4 वर्षे झाली आहे, तरी हे विधेयक मंजूर झालेले नाही. देशातील 30 कोटी दलित जनतेसाठी विधेयक अद्याप आलेले नाही.'
- डॉ. सिंह म्हणाले, 'कोर्टात आमचा कोणी प्रतिनिधीनाही, त्यामुळे कोर्टाकडून रोज आमच्याविरोधात नवे-नवे निर्णय येत आहेत. दलितांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. सध्याच्या स्थितीत भाजपचे दलित खासदारही पीडित आहेत. समाजचा तर रोजच छळ होत आहे. दलित समाजाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आरक्षण विधेयक मंजूर करावे आणि खासगी क्षेत्रातही ते लागू करावे.'

 

आपल्याच पक्षावर यूपीच्या दलित खासदारांची नाराजी
- खासदार अशोक दोहरे यांनी मोदींना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पोलिसांच्या अत्याचाराचा उल्लेख केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रॉसिटी कायदा सौम्य केला गेल्याच्याविरोधात 2 एप्रिल रोजी 'भारतबंद' पुकारण्यात आला होता. यानंतर उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये दलितांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना पोलिस त्रास देत असल्याचा आरोप अशोक दोहरे यांनी केला आहे. 
- पोलिस निर्दोष लोकांच्या घरात घुसून जातिवाचक शब्दांचा वापर करुन त्यांना घरातून ओढून काढत मारहाण करत आहेत. त्यांना अटक केली जात आहे. पंतप्रधानांनी याची लवकरात लवकर दखल घेऊन अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्याची मागणी खासदार दोहरे यांनी केली आहे.


मुख्यमंत्री योगींनी पिटाळून लावले- भाजप खासदार छोटेलाल
- केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकारला सध्या दलित प्रश्न सतावत असताना उत्तर प्रदेशातील दलित खासदाराने योगी सरकारविरुद्ध तक्रार केली आहे. - रॉबर्टसगंज येथील भाजपचे खासदार छोटेलाल खारवर यांनी योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. 
- 16 मार्च रोजी त्यांनी हे पत्र पंतप्रधानांना पाठवले होते. दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याचा प्रयत्न आपण केला होता, असे छोटेलाल खारवार यांनी लिहिले आहे. दोन्ही वेळा त्यांना दरडावून पिटाळून लावण्यात आले, असे त्यांचे म्हणणे आहे. 
- खारवार म्हणाले, 'माझ्या घरावर बळजबरीने कब्जा करत अधिकाऱ्यांनी ते जंगल क्षेत्रात असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या आदेशानंतर त्याची पुनः तपासणी करण्यात आली तेव्हा मात्र घर वनक्षेत्राच्या बाहेर असल्याचा अहवाल दिला गेला. जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी माझा छळ करत आहेत.'
- उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील भाजपच्या कामाचा तपशील छोटेलाल यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवला आहे. आपल्या संसदीय क्षेत्रामध्ये प्रशासन भेदभावपूर्ण भूमिका घेत आहे. त्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे पक्षातही सर्रास दुर्लक्ष केले जाते. 
- आपल्या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय आणि सुनील बन्सल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. 
- आपल्याच पक्षाकडून उपेक्षा होत असल्याची खंत छोटेलाल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय यांना तीन वेळा भेटलो. सुनील बन्सल यांचीदेखील तीनदा भेट घेतली. मुख्यमंत्री आदित्यनाथांची दोन वेळा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मला फटकारलेच. शिवाय कार्यालयातून जाण्यास सांगितले. 
- राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे आपण तक्रार केली. मात्र, तेथेही मला निराशाच पदरी पडली, असे छोटेलाल यांनी माध्यमांना सांगितले आहे. आपल्याच पक्षातील व्यक्तींकडून उपेक्षा सहन करावी लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...