आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभरात चालणाऱ्या बालसुधारगृहात अल्पवयीन गुन्हेगार मजेत आहेत. मग ते खून आणि अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकलेले असले तरीही. सरकार आणि या सुधारगृहांशी संबंधित संस्था या गुन्हेगारांची प्रत्येच लहान-मोठी इच्छा पूर्ण करत आहे. तेथे त्यांना सुधारण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते, त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना शिकवण्यासाठी बाहेरून विशेष शिक्षकही बोलावले जातात आणि कुटुंबीयांची कमतरता भासू नये म्हणून वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला जातो. सरकारने अल्पवयीन गुन्हेगारांना असे प्रशिक्षण द्यावे की त्यांना सुधारगृहातून बाहेर आल्यानंतर रोजगार मिळावा, अशी जबाबदारी बालगुन्हेगार न्याय कायदा-२०१५ मध्ये सांगण्यात आली आहे.
दुसरीकडे निर्भयावर झालेला अत्याचार असो की आताचे कठुआ कांड, अत्याचाराच्या प्रकरणात दररोज अल्पवयीनांचे नाव येत आहे. सध्या कठुआ प्रकरणातील आरोपीच्या वयावरून वाद सुरू आहे. पण नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अलीकडच्या उपलब्ध अहवालावर नजर टाकली तर २०१६ मध्ये देशभरात १९७० असे गुन्हे नोंदले गेले, ज्यात अल्पवयीनांवर अत्याचार, सामूहिक अत्याचार आणि अत्याचाराचा प्रयत्न असे गंभीर आरोप होते.
महिला आणि बाल विकास विभाग, नवी दिल्लीच्या संचालक शिल्पा शिंदे म्हणाल्या की, आम्ही मुलांना सतत मानसोपचारांची मदत करतो. त्यांच्यातील अपराधी भाव विसरला जावा आणि त्यातून बाहेर पडून मुख्य प्रवाहात स्वत:ला सामील करून घ्यावे हा हेतू. कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न होतो. त्याचबरोबर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नियोक्त्यांनाही आमंत्रित केले जाते. पाटणा येथील गायघाट सुधारगृहाचे पदाधिकारी सांगतात की, आपण कोणत्याप्रकारचा गुन्हा केला आहे हे मुलांना समजत नाही.
त्यामुळे त्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत प्रेमाने चर्चा करून सतत समुपदेशन केले जाते.पंजाबच्या होशियारपूर बाल सुधारगृहात शिक्षा भोगत असलेले आणि खटला सुरू असलेले अल्पवयीन आपल्या आवडीच्या वस्तू बाहेरून मागवतात. बर्गर, पिझ्झा, ज्यूस यांची मागणी झाल्यास ती पूर्ण केली जाते. त्याचे पैसे त्यांचे नातेवाईक देऊन जातात. त्याशिवाय व्यवस्थापनाकडून जेवणाचा मेन्यू निश्चित असतो. तो हंगामानुसार उपलब्ध भाज्या आणि फळांवर आधारित आहे. दिवसा काय बनवायचे याबाबत अल्पवयीन मुलांना विचारले जाते आणि जे बाजारात हंगामानुसार उपलब्ध भाजी असेल ती तयार केली जाते. त्यांनी रागावण्याची संधी मिळू नये हा हेतू. त्याशिवाय सणासुदीला मिठाई आणि विशेष जेवणही दिले जाते. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर नियमित तपासणी करतात.
फरीदकोटच्या बाल सुधारगृहातील मानसशास्त्र तज्ज्ञ सुरिंदर विज यांनी सांगितले की, येथे मुलांना विविध उपक्रमांत व्यस्त ठेवले जाते. खेळण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. इनडोअर-आउटडोअर खेळ खेळवले जातात. क्रिकेटचा संघही तयार करण्यात आला आहे. येथे क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात, त्यात बाहेरचे संघही सहभागी होतात. बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलही खेळले जातात. फरीदकोटचे एक संगीत शिक्षक येथे मोफत सेवा द्यायला येतात. लुधियानाच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रश्मी यांनी सांगितले की, आम्ही मुलांवर निगराणी ठेवतो, त्यांच्या खासगी समस्यांचे निराकरण करतो. सरकारचे तसे दिशानिर्देश आहेत. त्यांना मोफत कायदेशीर सहाय्य, जेवण आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सुधारगृहात आलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. ऑटो पार्ट्स, रेडिओचे भाग आणि इतर लहान उपकरण तयार करण्याचे काम शिकवले जाते. सुधारगृहात येणाऱ्या मुलांचे वय १८ वर्षांपर्यंत असते.त्यामुळे त्यांना वयानुसार व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. नंतर त्याचा पाठपुरावाही केला जातो.
भोपाळ येथील बाल सुधारगृहाच्या अधीक्षक कुमकुम संधीर यांनी सांगितले की, येथे येणाऱ्या मुलांना प्रेरित केले तर त्यांची जीवनदशा बदलते. मी तीन वर्षांपासून बाल सुधारगृहात मुलांना पाहत आहे. आतापर्यंत कुठलाही मुलगा येथून गेल्यानंतर पुन्हा एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणात परतलेला नाही. जेजे कायद्यात झालेल्या दुरुस्तीमुळे मुलांना मुख्य प्रवाहात परत येण्याची संधी मिळाली आहे. गुन्हा केला तरी अशा विधिसंघर्षग्रस्त मुलांची नावे जाहीर केली जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अपराधी असल्याचा शिक्का बसत नाही. त्यामुळे ते सहजपणे समाजात मिसळून जातात. दुसरीकडे, अनेक स्वयंसेवा संस्था मुलांचा पाठपुरावा घेतानाच त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करतात, मुलांना पुन्हा संधी मिळावी यासाठी समाजाला जागरूक करतात. त्यामुळे भटकलेल्या मुलांना नवी दिशा मिळते. नाशिकच्या दिशा फाउंडेशनतर्फे बालगृहाच्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. येथे ९ मुलांना बांधकामाचे प्रशिक्षण दिले आहे. आता ही मुले एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत आहेत.
बालसुधारगृहात असे बदलत आहे भविष्य
१. अत्याचारातील आरोपी, आता मुंबईत अभिनेता
अहमदाबादच्या निरीक्षणगृहात अत्याचाराच्या आरोपावरून १५ वर्षांचा एक मुलगा आला होता. रोज समुपदेशन करण्यात आले. त्याचा कल अभिनयाकडे असल्याचे उपक्रमात समजले. एखादा कार्यक्रम असला की त्याच्याकडून अभिनय करवून घेतला जात असे. आज या मुलाचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असून तो मुंबईत सहायक अभिनेता म्हणून कामही करत आहे.
२. वाढदिवशी केले ऑर्केस्ट्राचे आयोजन
ग्वाल्हेरच्या बालसुधारगृहात सध्या अल्पवयीन गुन्हेगारांच्या वाढदिवसाचे रेकॉर्ड ठेवले जाते. त्या दिवशी त्यांच्या आवडीचे जेवण तयार केले जाते. सकाळी त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते. केक कापला जातो. एकदा अल्पवयीनाच्या वाढदिवशी ऑर्केस्ट्राही आयोजित करण्यात आला होता. हा मुलगा पॉस्को कायद्यात आरोपी आहे. तो बालगृहातच आहे.
३. मित्राचा केला होता खून, आता झाला कंत्राटदार
फरीदकोटच्या बालसुधारगृहातील पंजाबचा एक मुलगा व्यसनी होता. त्याने आपल्या समवयस्क मित्राचा खून केला. सर्वात आधी त्याला व्यसनमुक्त करण्यात आले. नंतर बॅडमिंटन, व्हॉलीबॉलमध्ये व्यग्र करण्यात आले. आता तो हे खेळ चांगल्या प्रकारे खेळत आहे. सुटकेनंतर त्याने वन विभागात मजूर म्हणून काम सुरू केले, आता तो कंत्राटदार आहे. त्याच्याकडे २०-२५ लोक काम करतात.
४. अत्याचार केला होता, आता संगीत अकादमीचा झाला मालक
एक मुलगा होता. तो समवयस्क मुलीसोबत पळून गेला होता. दोघे ८-१० दिवस घराबाहेर राहिले. मुलाने मुलीवर अत्याचार केला. कोर्टातही ते सिद्ध झाले. शिक्षा झाली तेव्हा त्याला फरीदकोटच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले. त्याचे समुपदेशन केले तेव्हा त्याला अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्याबाबत माहिती नव्हते असे समजले. ३-४ महिन्यांच्या समुपदेशनादरम्यान त्याला शरीराच्या विविध अवयवांची माहिती देण्यात आली. त्याला लैंगिक शिक्षण देण्यात आले. त्यानंतर फरीदकोटच्या एका सरकारी शिक्षकाने या अल्पवयीन गुन्हेगाराला संगीत शिकवले. येथून गेल्यानंतर त्याने दिल्लीत संगीत अकादमी सुरू केली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, बालगृहातील मुलांना सरकार कोणत्या सुविधा पुरवते...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.