आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथ मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी त्यांना शिकवले; आज बनले प्राध्यापक-पोलिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- आंध्र प्रदेशातील जे. रामचंद्र सरतबाबू यांचेे जीवन आणि त्यांची कथा  एका जिद्दीचे उदाहरण ठरावे. गेल्या २४ वर्षांपासून ते रेल्वेत भीक मागणाऱ्या, खिसे कापणाऱ्या आणि चोरी करणाऱ्या अनाथ-भरकटलेल्या मुलांचे आयुष्य घडवत आहेत. नेल्लोर जिल्ह्यातील गोलापेलम गावातील सरत सांगतात, रेल्वेत कारकून म्हणून काम करत असताना, अनेक अनाथ आणि भरकटलेली मुले पाहत होतो. ही मुले काही गुंडांच्या टोळीत काम करत असत. काही मुले भीक मागून, रेल्वेेच्या डब्यात साफसफाई करून पोट भरत होती. 


सरतबाबू यांनी त्यांच्या आयुष्याला वळण लावण्याचे ठरवले. या मुलांसाठी आश्रम काढला. तेथे त्यांना आश्रय मिळवून दिला. त्यांना शिकवले. काही मुलांनी सरतबाबूवर प्राणघातक हल्लेही केले. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. या मुलांचे भवितव्य योग्य मार्गावर आणण्यासाठी ते झटत होते. आज त्यांच्यातील काही मुले शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पोलिस अधिकारी झाले आहेत. रामसरत म्हणाले, सुरुवातीला मुले कमी होती. तोपर्यंत मी मुलांचा खर्च उचलत होतो. परंतु  मुलांची संख्या वाढली, तेव्हा जागा आणि पैशांची कमतरता जाणवू लागली. मी मित्रांकडे, नातेवाइकांकडे मदत मागितली. काही दिवस असे काम सुरू होते. मग गावकरी व पंचायतीच्या मदतीने दोन केंद्रांची स्थापना केली. रेल्वेतून निवृ़त्तीनंतर याच कार्याला वाहून घेतले आहे. 


२० मुलांना घेऊन एका झोपडीत सुरू केला आश्रम
माझे वडील रेल्वेत इंजिन ड्रायव्हर होते. त्यांच्यासोबत रेल्वेस्टेशनला जात होतो. नोकरीत असतानाही, सोन्याची साखळी चोरणारे, खिसेकापू आणि सुटकेस चोरणारी मुले पाहत होतो. त्याचे निर्विकार चेहरे, डोळे पाहून खूप वाईट वाटत होते. या मुलांसाठी काहीतरी करावे, असे वाटत होते. उत्तर अमुलूर पंचायतीच्या मदतीने गावात ३०X१५ ची एक झोपडी तयार केली. यात २० मुलांना घेऊन गेलो. मी ४५ वर्षे स्काऊटमध्ये होतो. त्यांना शिस्तपालनाचे धडे दिले. त्यांना सुरुवातीला हे अडचणीचे वाटू लागले. येथील काही सामान चोरून मुले पळून जात. माझे मन उद्विग्न होत असे. परंतु मी प्रयत्न सोडला नाही. मुलांना फळे विकणे, अन्नपदार्थ तयार करणे, शिंपीकाम, संगणक चालवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांची मानसिकता जाणून घेण्यासाठी मी स्वत: समाजशास्त्र व क्रिमिनॉलाॅजीचा अभ्यास केला.

बातम्या आणखी आहेत...