आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैनितालमध्ये लावला शहर हाऊसफुल्लचा फलक; पार्किंग क्षमतेच्या तिप्पट वाहने दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैनिताल - एखाद्या शहरात दाखल होताना प्रवाशांचे स्वागत असे फलक विविध ठिकाणी झळकताना दिसतात. परंतु देशातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक नैनितालमध्ये ‘शहर हाऊसफुल्ल, लोकांनी शहरात दाखल होऊ नये’ असे फलक पाहायला मिळाले. शहराच्या क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक येत असल्याने प्रशासनाला हे पाऊल उचलावे लागले. 

 

सुट्यांचा काळ असल्याने अनेक जण खासगी वाहनांनी शहरात येत असल्याने पार्किंगच्या सर्व जागा भरल्या आहेत. रस्त्यावरही वाहनेच वाहने दिसत आहेत. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाने खासगी वाहने शहराच्या बाहेर सोडून शहरात दाखल होण्यास सांगितले. शहरातील अनेक भागात यासंदर्भातील बॅनरही लावण्यात आले आहेत. 

 
शहरातील  भीमताल चौक, काठगोदाम  पोलिस चौकीजवळील चौक आणि नरिमन चौकात अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत. नैनितालचे वाहतूक पोलिस अधिकारी महेश चंद्र म्हणाले की, ‘वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी शहरात सोमवारी बॅनर लावण्यात आले. पोलिसांना वाहतूक सांभाळताना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने ही शक्कल लढवण्यात आली. नैनितालमध्ये पार्किंगच्या १२ जागा आहेत. येथे दोन हजार चारचाकी पार्क केल्या जाऊ शकतात. परंतु शहरात दररोज ३ ते ४ हजार वाहने दाखल होत आहेत.

 

वाहनांची ही संख्या क्षमतेपेक्षा दुप्पट आहे. वीकेंडला दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून   पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने वाहतुकीची स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. रविवारी तर शहरात ६ हजार वाहने दाखल झाली होती.  त्यामुळे पर्यटकांना वाहने शहराबाहेर लावण्याचा आग्रह करण्याशिवाय पर्याय नव्हता. वाहनांना शहराबाहेर कालाढुंगी, नारायणनगर, रुसी बायपासजवळ थांबवले जात आहे.  


वास्तविक पाहता सध्या नैनितालमध्ये अाल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटकांची येथे गर्दी होत आहे. वाहतूक व्यवस्था बिघडल्याने उत्तराखंड हायकोर्टाने नैनितालचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना खडसावले व त्यांच्याविरुद्ध अवमाननेची नोटीस काढली आहे. एका आठवड्यात कोर्टाने उत्तर मागवले आहे. दरम्यान, जलसंकट असल्याने सिमल्यामध्येही काही दिवसांपूर्वी पर्यटकांनी शहरात दाखल होऊ नये,  
असे फलक लागले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...