आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपाताचे रॅकेट पकडून देण्यासाठी प्रसंगी स्वत:चा जीव टाकला धोक्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा- गर्भवती महिलांची अवैध सोनोग्राफी करणारे डॉक्टर आणि दलालांच्या रॅकेटचा भंडाफोड करण्यासाठी महिला समोर येत आहेत. पीसीपीएनडीटी (प्री-कॉन्सेप्शन अँड प्री-नेटल डायग्नोस्टिक टेक्निक अॅक्ट) च्या कारवाईत दलाल आणि अवैध सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांचा सामना या गर्भवती महिला करत असून त्यांना तुरुंगात पाठवत आहेत. राजस्थानमध्ये गेल्या वर्षी सर्वात जास्त म्हणजे अशा ४२ कारवाया झाल्या. त्यात गर्भवती महिला पीसीपीएनडीटीच्या चमूच्या माध्यमातून सोनोग्राफी केंद्रांवर गर्भलिंग तपासणी करण्यास गेल्या आणि अशा रॅकेटचा भंडाफोड केला. राज्यात पीसीपीएनडीटी विभागाचे प्रमुख, वरिष्ठ आयएएस अधिकारी नवीन जैन म्हणाले की, आमिष दाखवून जाळ्यात ओढणाऱ्या महिलांच्या (डिकॉय) मदतीशिवाय ही कारवाई शक्य नाही.


अशा कारवायांमुळेच राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात स्त्री-पुरुष महिलांच्या प्रमाणात मोठी सुधारणा झाली आहे. तेथे २०११ मध्ये मुलांच्या तुलनेत फक्त ८३७ मुली जन्माला येत असत. पण आता प्रति हजार मुलींची संख्या सुधारून ९५५ झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या झुंझुनू येथून पूर्ण देशासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिमेची सुरुवात केली आहे. अशाच काही महिलांची ही माहिती. त्या पीसीपीएनडीटीच्या विशेष चमूसह जिवाला धोका असलेल्या ठिकाणीही गेल्या, पण घाबरल्या नाहीत आणि कारवाई पूर्ण होईपर्यंत मागेही हटल्या नाहीत.

 

अशाच प्रकारच्या दोन मोहिमांत सीमा राठौर आणि डोली कंवर यांनीही सहभाग घेतला होता
- सीमा राठौर :
देई भागाची सीमा राठौरही एका कारवाईत डिकॉय होती. कारवाईसाठी सीमाला बुंदी येथून गुजरातला न्यावे लागले. रस्त्यात उलट्या सुरू झाल्या. कारवाई करू शकणार नाही, असे आम्हाला वाटले. अधिकाऱ्यांना कारवाई थांबवून महिलेला पुन्हा घरी सोडण्यास सांगितले, पण सीमा मागे हटली नाही. गुजरातच्या मोडसामध्ये तिच्या मदतीने एका रजिस्टर्ड डॉक्टरला अटक करण्यात आली. तिला आधीची एक मुलगी आहे आणि लिंग चाचणीतही मुलगीच सांगण्यात आली. तिने मुलीला नंतर जन्मही दिला.


- डोली कंवर : लाखेरीची रहिवासी डोली कंवर फेब्रुवारी २०१७ मध्ये दोन मोहिमांत सहभागी होती. डोलीला हृदयविकार आहे. गर्भवती झाल्यानंतर तिला श्वास घेण्यास खूप समस्याही झाली. पण पीसीपीएनडीटीच्या चमूला जेव्हा तिची गरज होती तेव्हा तिने कधीही नकार दिला नाही. बांसवाडा आणि अलवर येथे डोली कंवर हिच्या मदतीने दोन मोहिमा यशस्वी झाल्या. त्यात दोन डॉक्टर आणि तीन दलालांना अटक झाली.

 

सुनीता राठौर : दलालाने आग्ऱ्याला नेले होते

बुंदी येथील सुनीता राठौर (२८). २०१७ मध्ये दोन वेगवेगळ्या कारवायांत पीसीपीएनडीटी शाखेसोबत नकली ग्राहक होऊन गेल्या. एकदा तर त्यांच्या जिवाला असलेला धोका पाहून चमूचीही पाचावर धारण बसली होती. बुंदीचे पीसीपीएनडीटीचे समन्वयक राजीव लोचन यांनी सांगितले की, आम्हाला दौसा जिल्ह्याच्या एका दलालामार्फत कारवाई करायची होती. आम्ही सुनीताला सोबत नेले. दलाल आम्हाला लिंगनिदानासाठी आग्ऱ्याला घेऊन गेला. तेथून सुमारे १०० किमी दूर फिरोजाबादला घेऊन गेला. संशय आल्याने दलाल सुनीताला एकटीलाच घेऊन गेला आणि वाहने बदलवून फिरवत राहिला. सुमारे ३ तास आम्हाला त्याचे लोकेशनच मिळाले नाही. आम्ही सर्व जण घाबरलो, कारण कारवाईत सहभागी असलेल्या महिलेच्या सुरक्षेला आमच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व होते. नंतर संधी पाहून सुनीताने आम्हाला लोकेशन सांगितले. आम्ही पोहोचलो आणि सुनीताला ताब्यात घेतले. दलालाला अटक केली. मात्र या कारवाईत आम्ही डॉक्टरला पकडू शकलो नाही. सुनीताला तिच्या पतीचा खंबीर पाठिंबा आहे. तो कधीही मागे हटत नाही. 

बातम्या आणखी आहेत...