आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लैंगिक अत्याचारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामचे देशात २३० पेक्षा अधिक आश्रम आहेत. अनेक वादग्रस्त आश्रम आहेत. सरकारी आणि सामान्य लोकांच्या जमिनीही त्याने हडपल्याचे आरोप आहेत. दशकभरापूर्वीच आसारामच्या ताब्यातील जमिनींचा वाद चव्हाट्यावर आला होता. पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर त्याच्या पायाखालून आता या वादग्रस्त जमिनी सरकत आहेत. गुजरात, मध्य प्रदेशातील जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. गुजरात सरकारने २०१५ मध्ये भाडेतत्त्वावर दिलेली जमीन परत घेतली आहे. मोटेरा परिसरात ही १० एकर जमीन त्याला १५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली होती. २०१७ मध्ये मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्हा प्रशासनाने पंचेड येथील १५.२५ एकर जमीन ताब्यात घेतली. ही सरकारी जमीन २२ वर्षांपासून आसारामच्या ताब्यात होती.
जमीनविषयक कारवाई सर्वप्रथम हिमाचल प्रदेश सरकारने केली होती. २०१३ मध्ये प्रदेश सरकारने ३.५ एकर जमीन आसाराम ट्रस्टकडून परत घेतली. १९९४ मध्ये ही जमीन सरकारच्या लिलावात आसारामच्या दोन अनुयायांनी खरेदी करून भेट स्वरूपात दिली होती. मध्य प्रदेशच्या भोपाळ व इंदूरमध्ये आसारामला दिलेली जमीन प्रशासनाने परत घेण्याची तयारी केली आहे. भोपाळच्या गांधीनगर येथील आश्रमाची कुंपणभिंत विमानतळ प्रशासनाच्या जमिनीवर बांधली आहे.
अशा रीतीने आश्रमाने ४० कोटी किंमत असलेली ११ एकर सरकारी जमीन बळकावली आहे. त्याला इंदूर आश्रमातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासात लक्षात आले की, लीजच्या नियमांचे उल्लंघन करत येथे दोन मजली बंगला, जलतरण तलाव, पक्के रस्ते बांधले आहेत. शाळेचा परिसर ३० गुंठे सरकारी जमीन हडपून विकसित करण्यात आला. जिल्हा दंडाधिकारी कोर्टात हा खटला चालला. आसारामने उच्च न्यायालयातून स्टे घेतला होता. २०१३ मध्ये टिहरी येथे धरण विस्थापितांसाठी आरक्षित जमिनीतून १५० चौ. मीटरचा एक प्लॉट आसारामच्या नावे झाला. जलविकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संधान साधून प्लॉट आपल्या नावे करवून घेतल्याचा आरोप आहे. २०१३ मध्ये लखनऊच्या जिल्हा प्रशासनाच्या तपासात १० हजार चौ. फुटांची शासकीय जमीन आसाराम आश्रमाच्या नावे असल्याचे निष्पन्न झाले होते.
सरकारकडून जमीन मिळाल्याची ही दोन प्रकरणे
गुजरातमध्ये आसारामने १९७२ मध्ये अहमदाबादच्या मोटेरामध्ये पहिला आश्रम स्थापन केला होता. यानंतर राज्य सरकारनेच त्याला जमिनी दान दिल्या. १९८१ ते १९९२ दरम्यान काँग्रेसचे सरकार होते. त्यांनी १४,५०० चौरस मीटर जमीन दान दिली. त्यानंतर १९९७ ते १९९९ दरम्यान भाजप सरकारने २५००० चौरस मीटर जमीन आसारामला दान दिली. त्याने आश्रमाचा विस्तार करावा असा हेतू होता. २००० मध्ये आसारामला सरकारने नवसारी जिल्ह्यात १० एकर जमीन दिली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना दिग्विजय सिंह यांनी १९९८ मध्ये इंदुरात ५ कोटी किमतीची ६.८९ एकर जमीन आसारामच्या ट्रस्टला १ रुपया वार्षिक लीजवर (पट्ट्याने) दिली होती. २०१३ मध्ये लैंगिक अत्याचार उघड झाल्यानंतर यासाठी जाहीर माफीही मागितली होती.
भक्तांकडून जमीन
ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आसाराम कैदेत आहे, तिच्या वडिलांनी २००८ मध्ये उत्तर प्रदेशच्या शहाजहापूरमधील २ एकर जमीन दान दिली होती. अशा दान केलेल्या काही जमिनी आसारामच्या नावे आहेत.
अनेक बळकावल्या
छिंदवाड्यातील १० एकर जमिनीवर त्याचा आश्रम आहे. ही जमीन एका महिलेच्या मालकीची होती. तिचा खून करून त्यावर कब्जा करण्यात आल्याचा आरोप आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील नयनेश शहा नामक शेतकऱ्याने १५ हजार चौरस यार्ड जमीन हडपल्याचा आरोप केला.
पुढील स्लाईडवर वाचा, कसे उभे केले १० हजार काेटींचे साम्राज्य,कुठे किती आश्रम...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.