आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पावर नाराज तेलगू देसमची रालोआतून बाहेर पडण्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशच्या मागण्यांकडे केंद्रीय अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आल्यावरून नाराज झालेल्या तेलगू देसम पक्षाने रविवारी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यापुढे राहता येणार नाही, असे संकेत पक्षाच्या नेत्यांनी शुक्रवारी राजधानीत पत्रकारांशी बोलताना दिले. बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे.  


अर्थसंकल्पात रेल्वे विभाग, राजधानी अमरावतीशी संबंधित काही मागण्या केंद्राकडे करण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री तथा टीडीपीचे संसदीय नेते वाय. एस. चौधरी यांनी केला आहे. पक्षातील नेत्यांनी अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाच्या नेत्यांची रविवारी बैठक बोलावल्याची माहिती चौधरी यांनी दिली.  ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्रावर नव्या अर्थसंकल्पात भर दिला आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आंध्र प्रदेशाशी संबंधित मुद्द्यांकडे पाहिलेदेखील नाही, ही असमाधानकारक बाब आहे, अशी प्रतिक्रिया आंध्रचे अर्थमंत्री यनामाला रामकृष्णुडू यांनी दिली होती.  

 

अमरावतीसाठी निधी हवा होता  

अमरावती जगाला हेवा वाटेल असे शहर विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना चंद्राबाबू नायडू यांनी आखली आहे. त्यावर नायडू सरकारने कामदेखील सुरू केले आहे. परंतु विविध प्रकल्पांसाठी सरकारने केंद्राकडे निधीची मागणी केली होती. त्याकडे जेटली यांनी दुर्लक्ष केल्याने तेलगू देसमने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

 

आम्ही नको असू तर नमस्कारम..
 चार वर्षांपूर्वी भाजपने चंद्राबाबूंना अमरावती व पोलावरम प्रकल्पासाठी संपूर्ण मदतीची ग्वाही दिली होती. परंतु काहीही झाले नाही. आतापर्यंत आम्ही आघाडीधर्म पाळला. मात्र त्यांना (भाजप) आम्ही आघाडीत नकोत असे वाटत असल्यास आमचा मार्ग मोकळा आहे. नमस्कारम, अशा निर्वाणीच्या शब्दांत चौधरी यांनी संताप व्यक्त केला आहे.  

 

‘आमच्यासमोर आता तीन पर्याय शिल्लक राहिले ’  
आम्ही आता ‘युद्ध’ पुकारणार आहोत. खरे तर आता आमच्यासमोर तीन पर्याय उरले आहेत. पहिला पर्याय म्हणजे पुन्हा मन वळवणे आणि त्यांच्यासोबत राहणे. आमच्या पक्षाच्या खासदारांनी राजीनामा देणे हा दुसरा पर्याय आहे, तर आघाडीतून बाहेर पडण्याचा तिसरा पर्याय आहे. रविवारच्या बैठकीत आम्ही त्याबाबतचा निर्णय घेऊ.  
- टी. जी. वेंकटेशन, खासदार, तेलगू देसम. 


4 वर्षांपासून मदतीच्या प्रतिक्षेत  
- राज्याचे कॅबिनेट मंत्री एस. चंद्रमोहन रेड्डी यांनी मिटींगनंतर म्हटले की, बजेटबाबत सरकारला नाराजी कळवणार आहे. पक्षाच्या नेत्यांनी नायडू यांना म्हटले की, पुढील निर्णय त्यांनीच घ्यावा. 
- तेलंगणापासून विभक्त झाल्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून राज्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तेव्हापासूनच आम्हाला केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा होती. पण यावेळीही निराशाच हाती आली. 


गेल्या महिन्यात नायडू भेटले होते मुख्यमंत्र्यांना 
गेल्या महिन्यात सीएम नायडू यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी केंद्राकडे मागणी केली होती की, राज्य वेगळे झाल्यानंतर आंध्रप्रदेशला विकासासाठी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यात यावीत. 

 

बातम्या आणखी आहेत...