आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Analysis: कर्नाटकात \'कमळ\' फुलले, भाजपचे जोरदार पुनरागमन; यामुळे काँग्रेसचा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकात भाजपचे जोरदार पुनरागमन झाले आहे. - Divya Marathi
कर्नाटकात भाजपचे जोरदार पुनरागमन झाले आहे.

बंगळुरु - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार पुनरागमन केले आहे. बहुमतासाठी आवश्यक 112 जागांपेक्षा जास्त जागांवर भाजपने झेंडा फडकवला आहे. सुरुवातीला जेडीएसला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्रिशंकु स्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. जेव्हा सर्व मतदारसंघाचे कल स्पष्ट झाले तेव्हा भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत आले आहे. 115 ते 117 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत. तर, काँग्रेस 63 आणि जेडीएस त्यांच्या 40 जागा कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहे. 12 मे रोजी 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झाले. 

 

भाजप बहुमताच्या दिशेने... 
या निवडणूकीतून येदियुरप्पा यांचे पुनरागमन

- कर्नाटकात भाजपने 2008 मध्ये स्वबळावर सत्ता संपादन केली होती. तेव्हा येदियुरप्पा यांना नेतृत्व देण्यात आले होते. मात्र नंतर खाण घाटाळ्यांचे आरोप झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. यामुळे नाराज होऊन येदियुरप्पा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला होता. 2013 मध्ये त्यांनी कर्नाटक जनता पक्षाच्या नेतृत्वात निवडणूक लढली होती. 
- येदियुरप्पा यांनी पक्षाची साथ सोडल्याने 2013 मध्ये भाजप सत्तेवरुन पायउतार झाली होती. येदियुरप्पा यांच्या केजेपीला 6 जागा मिळाल्या होत्या. येदियुरप्पा यांच्या पक्षाला 9.8% मते मिळाली होती. भाजपचा सत्तेचा मार्ग रोखण्यात ही मतांची टक्केवारी महत्त्वाची ठरल्याचे मानले जात होता. यावेळी भाजपने कोणताही धोका पत्करायचा नाही असे ठरवून येदियुरप्पा यांच्यासह भ्रष्टाचाराचा आरोप असेल्या रेड्डी बंधुंनाही सोबत घेतले. येदियुरप्पा यांना फक्त सोबत घेतले नाही तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार केले. यामुळे यंदा भाजपच्या मतांची विभागणी टळली आणि एकगठ्ठा मते भाजपला मिळाली. 

 

> सिद्धारमैया यांचे लिंगायत कार्ड फेल, काँग्रेसचे मोठे नुकसान 
- सिद्धारमैया यांनी निवडणूक तारखा घोषित होण्याच्या तोंडावर राज्यात लिंगायत कार्ड खेळले होते. लिंगायत समाजाला त्यांनी धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याचा प्रस्ताव विधानसभेत पारित केला आणि केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवला होता. सिद्धारमैया यांनी खेळलेले लिंगायत कार्ड त्यांच्यावर बुमरँग झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लिंगायतांची राज्यात 17% लोकसंख्या आहे, ती 9% असल्याचे मानले गेले. त्यामुळे हा समाज काँग्रेसवर नाराज झाला होता. अल्पसंख्याक दर्जामुळे वोक्कालिगा समाज आणि लिंगायतांमधील दुसरा समाज वीरशैव हेही नाराज होते. 

 

> मोदींनी 21 सभा घेऊन कव्हर केले 115 मतदारसंघ 
- मोदींनी 1 मेपासून कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. सुरुवातीला ते 15 सभा घेतील असे सांगितले गेले होते, मात्र मोदींनी संपूर्ण प्रचारात 21 सभा घेतल्या. दोनवेळा नमो अॅपद्वारे पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अॅपद्वारे पक्षाच्या एससी,एसटी आणि ओबीसी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला होता. मोदींनी जवळपास 29 हजार किलोमीटर अंतर या प्रचारात कापले होते. या दरम्यान ते एकाही धार्मिक ठिकाणी गेले नाही. 
- मोदींनी उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्यात 20 कोटी लोकसंख्या आणि 403 मतदारसंघ असलेल्या या राज्यात 24 सभा घेतल्या होत्या. कर्नाटकाची लोकसंख्या 6.4 कोटी आणि 224 मतदारसंघ आहेत, येथे 21 सभा घेतल्या. मोदींनी सर्वाधिक प्रचारसभा (34) या गुजरातमध्ये घेतल्या होत्या. त्या पाठोपाठ त्यांनी 31 सभा बिहारमध्ये घेतल्या होत्या. 

- भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी 27 जाहीर सभा आणि 26 रोड शो केले. 40 केंद्रीय मंत्री, 500 खासदार-आमदार आणि 10 मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकात प्रचार केला. भाजप नेत्यांनी 50 पेक्षा जास्त रोड शो केले. या सर्वांनी 400 पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या. 

- राहुल गांधी यांनीही मोदींच्या तोडीस तोड जाहीर सभा घेतल्या. राहुल गांधी यांनी 20 जाहीर सभा, 40 रोड शो आणि कॉर्नर सभांना संबोधित केले. एक प्रकारे राहुल गांधी यांनी मोदींच्या तुलनेत दुप्पट प्रवास केला. त्यांनी 55 हजार किलोमीटर प्रवास केला. सोनिया गांधी या बऱ्याच मोठ्या काळानंतर प्रचारात उतरल्या होत्या. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही त्या आल्या नव्हत्या, मात्र कर्नाटकात त्यांनी प्रचार केला. 

 

2013 च्या तुलनेत भाजपला 77 जांगाचा फायदा 

पक्ष 2018 चा कल 2013 फायदा-तोटा
काँग्रेस 62 122 -60
भाजपा 117 40 +77
जेडीएस 44 40 +4
इतर 02 22 -18

काँग्रेसच्या मतांची टक्केवारी थोडी वाढली मात्र जागा घटल्या 

पक्ष 2018 2013 फायदा - तोटा
काँग्रेस 37.3% 36.6% + 0.7%
भाजपा 37.6% 19.9% +17.7%
जेडीएस 17.9% 20.2% -2.3%
इतर 7.2% 23.3% -16.1%
बातम्या आणखी आहेत...