आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress RJD Has Sought An Opportunity To Form Government In Bihar, Manipur, Goa And Meghalaya, According To Karnataka Formulas

कर्नाटक सूत्रानुसार काँग्रेस-राजदने बिहार, मणिपूर, गोवा, मेघालयात सरकार स्थापनेची संधी मागितली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - सुप्रीम कोर्टात बुधवारी रात्रभर चाललेल्या नाट्यमय घडामोडीनंतर गुरुवारी सकाळी बी. एस. येदियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी देण्याच्या सूत्राच्या आधारे चार इतर राज्यांत नव्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. बिहार, गोवा, मणिपूर आणि मेघालय या राज्यांत सर्वात मोठे पक्ष असूनही विरोधी बाकावर असलेल्या पक्षांनी आता सत्ता स्थापनेसाठी दावा सुरू केला आहे.


बिहारमध्ये राजद नेते तेजस्वी यादव विधानसभेत आमदारांची परेड करतील. गोव्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने सत्तेचा दावा दाखल करण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्याचे ठरवले आहे. मणिपूरमध्ये माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह आणि मेघालयाचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा यांनीही शुक्रवारी राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला असला तरी येदियुरप्पा यांना अजूनही दोन अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. सुप्रीम कोर्ट शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता येदियुरप्पांनी सादर केलेली दोन्ही पत्रे तपासणार आहे. याच आधारे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्तेसाठी पाचारण केले होते. त्यांना १५ दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.  विशेष म्हणजे काँग्रेस व जेडीएसचा सत्ता स्थापनेचा दावा फेटाळून राज्यपालांनी बुधवारी रात्री येड्डींना निमंत्रित केले होते. या विरोधात काँग्रेस-जेडीएस बुधवारी रात्रीच सुप्रीम कोर्टात पोहचले. रात्री सव्वादोन ते पहाटे ५ पर्यंत झालेल्या सुनावणीत राज्यपालांच्या निर्णयावर स्थगितीस कोर्टाने नकार दिला. मात्र, त्यांचे मुख्यमंत्रिपद सुप्रीम कोर्ट शुक्रवारी जो निकाल देईल त्यावर अवलंबून असेल, असेही कोर्टाने नमूद केले.

 

दोन कार्यकाळात ३ वर्ष ७१ दिवस सीएम राहिले
* येदियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून हा तिसरा कार्यकाळ आहे.  मात्र यापूर्वी दोन वेळा ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. या दोन कार्यकाळात ते ३ वर्ष ७१ दिवसच पदावर राहू शकले.

 

सुप्रीम कोर्टात आणखी दोन याचिका झाल्या दाखल

*  दहा महिन्यांपूर्वी वकिली व्यवसायातून निवृत्ती घेणारे माजी कायदा मंत्री राम जेठमलानी यांनी सरन्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर कर्नाटकात भाजपला सत्तेसाठी निमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. मात्र, ही याचिका न्या. सिकरी यांच्या पीठासमोर दाखल करण्याचे निर्देश सरन्यायाधीशांनी दिले.


*  राज्यपालांनी विनिषा नेरो यांना विधानसभेत अँग्लो इंडियन सदस्य म्हणून नेमण्याच्या निर्णयास काँग्रेस-जेडीएसने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. येड्डींचे बहुमत सिद्ध होईपर्यंत ही नियुक्ती थांबवावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यावर शुक्रवारीच सुनावणी होईल.

 

पुढील स्लाईडवर वाचा, रिसॉर्टमधील काही आमदार बेपत्ता झाल्याचा दावा, पंजाब-केरळला नेण्याची तयारी

 

 

बातम्या आणखी आहेत...