आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक निवडणूक: सभागृहात ब्ल्यू फिल्म पाहणाऱ्यांना, अवैध खाणकाम करणाऱ्यांना तिकीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप, जनता दल-धर्मनिरपेक्ष (जेडीएस) या तिन्ही पक्षांनी सुमारे १०० तिकिटे फौजदारी खटले दाखल झालेल्या उमेदवारांना दिली आहेत. एका अंदाजानुसार, कर्नाटकच्या २२४ विधानसभा जागांवर २६०० पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी ३४० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ही संख्या एकूण उमेदवारांच्या १३ टक्के एवढी आहे.  


भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येदियुरप्पा यांच्यावर काँग्रेस पक्ष थेट घोटाळ्यांचा आरोप करत आहे. बेल्लारीचे खाण व्यावसायिक रेड्डी बंधू आणि त्यांच्याशी संबंधित पाच लोकांना तिकिटे दिल्याबद्दलही काँग्रेस निशाणा साधत आहे. काँग्रेसने २+१= दोन रेड्डी आणि एक येदी म्हणजे येदियुरप्पा अशी घोषणा करून भ्रष्टाचाराला मुद्दा बनवला आहे.

 

दुसरीकडे, भाजपही सिद्धरामय्या मंत्रिमंडळावर सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे. सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील मंत्री डी. के. शिवकुमार यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात ईडीची चौकशी तसेच विविध उमेदवारांवरील आरोपांचा भाजप उल्लेख करत आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीचे कथित वकील एच. एस. चंद्र यांना काँग्रेसने तिकीट दिले होते.

 

वाद झाल्यानंतर त्यांच्या जागी मदीकेरी येथून के. पी. चंद्रकला यांना उमेदवारी द्यावी लागली. विशेष म्हणजे उमेदवार आणि निवडणूक यावर लक्ष ठेवणारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफाॅर्म्स (एडीआर) या संस्थेनुसार, भाजपने ३०, काँग्रेसने ४८ आणि जेडीएसने १७ जणांवर गुन्हे दाखल असूनही त्यांना तिकीट दिले आहे. मागील निवडणुकीतही ते आपापल्या पक्षांचे उमेदवार होते. भाजपने विधानसभेत मोबाइलवर अश्लील क्लिप पाहताना आढळलेले लक्ष्मण सावादी आणि सी. सी. पाटील या दोन माजी मंत्र्यांना पुन्हा उमेदवार बनवले आहे.  


याबाबत बोलताना एडीआरचे संस्थापक सदस्य प्रा. त्रिलोचन शास्त्री यांनी सांगितले की, २०१३ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या वेळीही प्रमुख पक्षांनी कलंकित, गंभीर आरोप असलेल्या उमेदवारांना जवळपास सारख्याच संख्येत निवडणुकीत उतरवले आहे. सोशल मीडियावर नेटवर्क तयार करून लोक आवाज उठवत आहेत. त्यामुळेच उमेदवारांना प्रश्न विचारणारे लोक चर्चेत आहेत. बिअर नको पाणी हवे, जात नको जॉब हवा अशा घोषणा सतत समोर येत आहेत.  


हे वादग्रस्त उमेदवार सर्वाधिक चर्चेत  
१. रेड्डी बंधू : माजी मंत्री आणि खाण घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी यांचे मोठे भाऊ जी. करुणाकर रेड्डी यांना भाजपने हरापनहल्ली येथून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याशिवाय दुसरे रेड्डी बंधू जी. सोमशेखर रेड्डी यांना बेल्लारी मतदारसंघातून तिकीट दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारीच प्रचारासाठी बेल्लारीला जाण्याची परवानगी मागणाऱ्या रेड्डी बंधूंना परवानगी दिलेली नाही. राहुल गांधी यांनी रेड्डी बंधूंवर ३५ हजार कोटी रुपयांच्या चोरीचा आरोपही लावला आहे. दोन रेड्डी बंधूंव्यतिरिक्त त्यांच्या जवळचे बी. श्रीरामलू यांना मोलकालमुरू, नातेवाईक सन्ना फकीरप्पा यांना बेल्लारी ग्रामीण, टी. एच. सुरेश बाबू यांना कंपली आणि अभिनेता साईंकुमारला बोगेपल्ली येथून तिकीट दिले आहे.  


२. येदियुरप्पा सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि भाजप आमदार लक्ष्मण सावादी हे विधानसभेचे कामकाज सुरू असताना मोबाइल फोनवर ब्ल्यू फिल्म पाहत असताना आढळले होते. त्यांच्यासोबत त्याच सरकारमधील पर्यावरणमंत्री कृष्णा जे. पालेमर आणि महिला व बालविकास मंत्री सी. सी. पाटील हेही लक्ष्मण सावादी यांच्या फोनमध्ये ब्ल्यू फिल्म पाहण्यात दंग होते. हे तिघे जेव्हा ब्ल्यू फिल्म पाहत होते तेव्हा विधानसभेत दुष्काळी स्थितीवर चर्चा सुरू होती. या विधानसभा निवडणुकीत सी. सी. पाटील यांना नारगुंडा येथून तर लक्ष्मण सावादी यांना अथनी मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले आहे.  


३. सिद्धरामय्या सरकारच्या अनेक मंत्र्यांवर भाजप आणि विरोधी पक्ष आरोप करत आहेत, पण निशाण्यावर सर्वात जास्त मंत्री डी. के. शिवकुमार आहेत. शिवकुमार यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात ईडीची चौकशी सुरू आहे. काँग्रेसने त्यांना कनकपुरातून उमेदवारी दिली आहे.  


४. बंगळुरूच्या राजराजेश्वरीनगर मतदारसंघातून विद्यमान आमदार एन. मुनीरत्ना नायडू यांना काँग्रेसने पुन्हा तिकीट दिल्याने काँग्रेसच्या नगरसेविका आणि पक्षाच्या नेत्या आशा सुरेश नाराज झाल्या आहेत. त्यांनी जेडीएसचे उमेदवार जी. एच. रामचंद्र यांना खुला पाठिंबा दिला आहे. नायडूंचे वादाशी जुने नाते आहे. कोट्यवधी रुपयांच्या बनावट देयक प्रकरणात आरोपी आमदाराच्या विरोधात सीआयडी चौकशी सुरू आहे. नायडू यांच्यावर तीन महिला कार्यकर्त्यांच्या शोषणाचा आरोप लावला होता.  


५. ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांना भाजपने शिमोगातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्यावर एकूण चार गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर गंभीर चार कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. त्यापैकी दोन कलमे गंभीर आरोपांची आहेत.  


६. देवानगिरी उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार एस. एस. मल्लिकार्जुन यांच्यावर एकूण चार गुन्हे दाखल आहेत. त्यात दोन कलमे गंभीर आहेत. मल्लिकार्जुन यांच्याकडे ६० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.  

बातम्या आणखी आहेत...