आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात घुसून कर्नाटक लोकायुक्तांवर चाकूहल्ला; लोकायुक्त शेट्टी गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जस्टिस शेट्टी यांनी गेल्यावर्षी जानेवारीमध्येच लोकायुक्त पद सांभाळले होते. - फाइल - Divya Marathi
जस्टिस शेट्टी यांनी गेल्यावर्षी जानेवारीमध्येच लोकायुक्त पद सांभाळले होते. - फाइल

बंगळुरू- कर्नाटकचे लोकायुक्त न्या. पी. विश्वनाथ शेट्टी यांच्यावर बुधवारी दुपारी एका तरुणाने त्यांच्या कार्यालयातच चाकूने तीन वेळा वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लोकायुक्त शेट्टी यांना तातडीने माल्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीस असलेला धोका आता टळला आहे, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली.  


चाकूने वार करून पळून जाणारा आरोप तेजस शर्मा यास पोलिसांनी लाेकायुक्त कार्यालयाच्या परिसरातच पकडले. त्याने लोकायुक्तांवर हल्ला का केला, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस लाेकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचा बहाणा करून कार्यालयात शिरला होता. परंतु लोकायुक्त शेट्टी यांच्या दालनात जाताच त्याने चाकू काढून शेट्टी यांच्या पोटात चाकू खुपसला. गृहमंत्री रेड्डी यांनी सांगितले, शेट्टी यांच्यावर चाकूने तीन वेळा वार करण्यात आले आहेत. हल्ला झाल्याचे समजताच कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या पोलिस व सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरास कार्यालय परिसरात अटक केली. 


कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री रेड्डी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडे विचारपूस केली. लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी (७३) हे यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते, हे उल्लेखनीय. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलीही केली आहे. जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी कर्नाटकात लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता.  


सुरक्षेत कोठे चूक झाली याची चौकशी करू

कर्नाटकचे कायदा मंत्री टी. बी. जयचंद्र यांनी सांगितले, लोकायुक्तांवर झालेला हल्ला खूप गंभीर बाब आहे. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहोत. सुरक्षा व्यवस्थेत कोठे त्रुटी राहिल्या होत्या, याचीही चौकशी करण्यात येईल. या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्यात येईल, असे कायदामंत्री जयचंद्र यांनी सांगितले. 


वकील बनून कार्यालयात घुसला हल्लेखोर 
न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर सीएम सिद्धरमैय्या जस्टीस शेट्टी यांची चौकशी करण्यासाठी माल्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. आरोपीने लोकायुक्त कार्यालयात वकीत असल्याचे खोटे सांगून प्रवेश मिळवला होता. 


गेल्यावर्षी बनले लोकायुक्त 
जस्टीस शेट्टी यांनी जानेवारी, 2017 मध्ये कर्नाटकच्या लोकायुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या आधी जस्टीस वाय भास्कर राव लोकायुक्त होते. पण डिसेंबर 2015 मध्ये राव यांच्या मुलावर गैरव्यवहाराचे आरोप झाले. त्यानंतर त्यांना सरकार आणि लोकांच्या दबावामुळे राव यांना राजीनामा द्यावा लागला होता. 

 

 

बातम्या आणखी आहेत...