आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायावतींची खेळी : राज्यसभेच्या अटीवर ‘सपा’ला पाेटनिवडणुकीसाठी पाठिंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - राज्यसभेच्या एका जागेसाठी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी अापले राजकीय मतभेद बाजूला ठेवून उत्तर प्रदेशात चक्क समाजवादी पक्षाशी समझोता केला.  काँग्रेसला बाजूला सारत बसपाने गोरखपूर-फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर बसपाच्या एका उमेदवारास राज्यसभेत पाठवण्यासाठी समाजवादी पक्ष मदत करणार आहे. त्याबदल्यात बसपाला समाजवादी पक्षास विधान परिषदेत मतदान करावे लागणार आहे.


मायावती म्हणाल्या, हा निवडणूक समझोता नाही. उलट “इस हाथ ले, उस हाथ दे’ असा फॉर्म्युला आहे. त्यांनी काँग्रेसलाही ऑफर दिली अाहे. राज्यसभा  निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील बसपाची मते हवी असतील तर उत्तर प्रदेशात त्यांना मदत करावी लागेल.  विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, राम मंदिर लाटेत भाजपला रोखण्यासाठी सपा आणि बसपा १९९३ मध्ये एकत्र आले होते. परंतु २ जून १९९५ मध्ये लखनऊच्या विश्रामगृहाच्या प्रकरणानंतर आघाडी तुटली होती. सपा नेत्यांनी मायावतींना विश्रामगृहात कोंडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मायावती आणि सपामध्ये राजकीय मतभेद न राहता, वैयक्तिक झाले होते.


तत्पूर्वी, बसपाचे गोरखपूर येथील प्रभारी घनश्यामचंद्र खरवार यांनी सपा उमेदवार प्रवीणकुमार निषाद यांना पाठिंब्याची घोषणा केली. तर अलाहाबादमधील विभागीय समन्वयक अशोक गौतम यांनी फुलपूर मतदारसंघातील सपा उमेदवार नागेंद्रसिंह पटेल यांना पाठिंबा दिला आहे. मायावती म्हणाल्या, आमचा पक्ष पोटनिवडणुका लढवणार नाही. यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना भाजपविरोधातील प्रबळ विरोधी उमेदवारास मदत करण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या १० जागांवर निवडणुकीची अधिसूचना सोमवारी जारी होईल. गरज पडल्यास २३ मार्चला मतदान होईल.

 

उत्तर प्रदेशात १९ अामदार असलेल्या बसपासाठी ‘राज्यसभा’ सोपी नाही

१९ आमदार असलेल्या बसपाला उत्तर प्रदेशात स्वबळावर राज्यसभा निवडणूक लढवणे तेवढे सोपे राहिलेले नाही. बसपा राज्यसभेतील किंवा विधान परिषदेतील एकही जागा स्वबळावर जिंकू शकत नाही. ४७ आमदार असलेल्या सपाकडे  त्यांचा एक उमेदवार निवडून दिल्यानंतर काही मते शिल्लक उरतात. सपा-बसपा समझोत्यानुसार काँग्रेसच्या पदरात काहीच पडलेले नाही. परंतु मताच्या गणितात त्यांच्या ७ आमदारांनाही महत्त्व आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी ३८ मते आवश्यक असतात.  १० पैकी ८ जागांवर भाजप उमेदवार विजयी होतील. त्यानंतर भाजप आघाडीकडे २१ आमदार उरतात. ९वी जागा जिंकण्यासाठी सपाकडे ९ आमदार असतील. १० व्या जागेसाठी बसपाचे १९ व सपाचे ९ आमदार मिळून हा आकडा २८ वर जाईल. काँग्रेसचे ७ व रालोदचा एक आमदार मिळून आणखी काही आमदारांची गरज भासणार आहे. इतकी तडजोड करूनही भाजप अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरवू शकते. यासाठी बसपाला राज्यसभा लढवणे सोपे नाही.

 

बातम्या आणखी आहेत...