आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाय घेऊन जाणाऱ्या तरुणाचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू; राजस्‍थानातील घटना, 2 अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामगड/ अलवर- राजस्थानातील अलवर जिल्ह्यात जमावाने गोतस्करीच्या आरोपावरून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री रामगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ललावंडी गावात घडली. हत्येच्या आरोपावरून गावातील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मारला गेलेला अकबर खान नावाचा तरुण चार वर्षांपूर्वी गोतस्करी प्रकरणात वाँटेड होता.

 

रामगड पोलिस ठाण्याचे प्रमुख सुभाष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबर खान हरियाणातील नूंह जिल्ह्यातील कोळगावचा रहिवासी होता. त्याचा साथीदार अस्लमसोबत शेताकडून दोन गाई घेऊन पायी हरियाणाकडे जात होता. शुक्रवारी रात्री गावकऱ्यांनी त्याला घेरले. अस्लम तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. जमावाच्या तावडीत सापडलेल्या अकबरला काठ्या-लाठ्यांनी मारहाण सुरू झाली. दरम्यान, रात्री १२.५० वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. ललावंडी-अलावडा मार्गावर असलेल्या घटनास्थळी पोलिस पोहोचले. तेव्हा जमाव पळून गेला.

 

गावातील धर्मेंद्र यादव व परमजितसिंग हे दोघे गाईसोबत शेतात उभे होते. जवळच चिखलात माखलेला तरुण जखमी अवस्थेत पडलेला हाेता. पोलिसांनी त्याला रामगड सामान्य रुग्णालयात नेले. वाटेत पोलिसांना अकबरने सांगितले, या गाई लाडपूर येथून विकत आणलेल्या होत्या. रुग्णालयात जाईपर्यंत अकबरचा वाटेत मृत्यू झाला. पोलिसांनी धर्मेंद्र यादव व परमजितसिंग यांना अटक केली आहे. अलवर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे, जमावाला कायदा हातात घेण्याचा अधिकार देता येणार नाही. राज्यांनी यावर कठोर कारवाई करून बंदी घातली पाहिजे, असे चारच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

 

वडील म्हणाले, बकरा विकत घ्यायचा आहे, असे सांगून निघाला होता
अकबरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेले त्याचे वडील सुलेमान यांनी सांगितले, बकरा विकत घ्यायचा आहे, असे सांगून शुक्रवारी सकाळी ९ वाजता अस्लमसोबत तो दुचाकीवरून निघाला होता. शनिवारी सकाळी ८ वाजता अलवरच्या निधनाचे वृत्त समजले. गावात मजुरी, बकऱ्या विक्री व खाणीत दगड फोडण्याचे काम अकबर करत होता. त्याला तीन मुली व चार मुले अशी एकूण सात अपत्ये आहेत.


२०१४ मध्ये गोतस्करीत पकडले होते : नौगावा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबरला गो तस्करीच्या गुन्ह्यात चार वर्षापूर्वीपासून तो वाँटेड होता. २४ डिसेंबर २०१४ रोजी गो तस्करी प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हाही लोकांनीच त्याला पकडले होते. त्याच्यासोबत अारिफ अतर नावाचा तरुणही अारोपी होता. या प्रकरणात दोघांवर आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहे.

 

गोरक्षेच्या नावाखाली अलवरमध्ये तिसरे हत्याकांड :
अलवरमध्ये गेल्या सव्वा वर्षात गोरक्षेच्या नावाखाली हे तिसरे हत्याकांड आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात पहलू खान यास गो तस्करीच्या संशयावरून ठार मारण्यात आले. तोही गाय घेऊन हरियाणाकडे निघालेला होता. गेल्या नोव्हेंबर महिन्यात उमर खान नावाचा तरुण रेल्वे मार्गावर मृतावस्थेत सापडला होता.

 

बातम्या आणखी आहेत...