आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागालँडमध्ये स्थिर सरकार देण्याची मोदींची ग्वाही;भाजप-एनडीपीपी आघाडीला कौल देण्याचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोहिमा- नागालँडला मजबूत आणि स्थिर सरकारची गरज आहे. भाजप-एनडीपीपी आघाडी असे सरकार वास्तवात आणू शकते. राज्याच्या महसुलाची हानी होऊ नये. रस्त्यांच्या माध्यमातून राज्यातील गावे परस्परांशी जोडली जायला हवीत, असे प्रयत्न भाजपचे सरकार करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली.  


ईशान्येकडील राज्यांच्या बाबतीत माझे धोरण स्पष्ट आहे. मला दळणवळणाच्या माध्यमातून सर्व राज्यांचा विकास साध्य करायचा आहे, असे मोदी म्हणाले. कोहिमापासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावरील तुएनसांग शहरात गुरुवारी आयोजित एका जाहीर सभेत मोदींनी मार्गदर्शन केले. नागालँडमध्ये केंद्र सरकारने रस्ते मार्गांचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार वर्षांत केंद्राने ५०० किमींचे राष्ट्रीय महामार्ग बनवण्यास सुरुवात केली.  अशा प्रकल्पांवर सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे जनतेने भाजप-एनडीपीपी आघाडीला कौल द्यावा, असे आवाहन मोदींनी जनतेला केले. कारण हे सरकार आलेला निधी थेट जनतेपर्यंत पोहोचवणारे अाहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा मदतीमधील त्रुटी दूर करणे शक्य होतील, असा दावाही मोदींनी केला.  दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजी ६० सदस्यीय विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप २० जागी उमेदवार उभे करणार आहे. एनडीपीपीचे ४० जागी उमेदवार असतील.  


गावापर्यंत केवळ १५ पैसे 

केंद्र सरकार सर्व राज्यांना भरघोस निधी देत आहे. परंतु प्रत्यक्ष जनतेपर्यंत एक रुपयातील केवळ १५ पैसे पोहोचू लागले आहेत. गावापर्यंत संपूर्ण रुपया पोहोचू दिला जात नाही, हे सत्य आहे असे मोदी यांनी सांगितले.  


सेंद्रिय बाजारपेठ बलस्थान 

संपूर्ण ईशान्येकडील राज्यांत सेंद्रिय बाजारपेठेला मोठा वाव आहे. जागतिक स्तरावर सेेंद्रिय बाजारपेठेतून नागालँडला मोठा महसूल मिळू शकतो. स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. ही संधी सर्वांना मिळावी यासाठी केंद्राने त्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे, असे मोदी यांनी सांगितले.  

 

स्मार्ट सिटीसाठी १८०० कोटी  
राजधानी कोहिमाला स्मार्ट सिटी करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला १८०० कोटी रुपये देऊ केले आहेत. लवकरच हा निधी दिला जाणार आहे. त्यानंतर कोहिमात स्मार्ट सिटी साकार होणार आहे. त्याचा लाभ होईल. 

बातम्या आणखी आहेत...