आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने व्होट बँकेचे राजकारण संपवले-अल्पसंख्यांक मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नक्वी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने तुष्टीकरण आणि व्होट बँकेचे राजकारण  संपवले आहे. अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे राजकारण देशात सुरू होते. ते संपवण्यात यश मिळवले आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.  


नऊ राज्यांच्या अल्पसंख्याक मंत्र्यांच्या बैठकीत गुरुवारी नक्वी यांनी मार्गदर्शन केले. नक्वी म्हणाले, देशात अनेक वर्षांपासून तुष्टीकरण आणि व्होट बँकेचे राजकारण केले जात होते. मात्र, भाजप सत्तेवर आल्यापासून हे राजकारण संपले आहे. समाजातील प्रत्येक समुदाय घटकाला तुष्टीकरणाशिवाय आत्मसन्मानाने विकास करण्याची संधी मिळावी. त्यासाठी सरकारने धोरण राबवले आहे. त्यातून नागरिकांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, सरकारच्या विविध योजनांची माहिती विविध राज्यांना देण्यात आली. योजना राबवण्यासाठी २८० नियामक संस्था देशात कार्यरत आहेत. 

 

विकासात अल्पसंख्याक समुदाय समान भागीदार असल्याची भूमिका

समाजाचा विकास करायचा झाल्यास अल्पसंख्याक समुदायाचा विकास आणि त्यांचे योगदान या दोन्ही गोष्टींना लक्षात घ्यावे लागेल. त्याशिवाय संपूर्ण विकासाची कल्पना करता येणार नाही. त्यामुळे सरकारने अल्पसंख्याकांना विकासातील समान भागीदार म्हणून स्वीकारले पाहिजे, याची जाणीव बाळगली आहे, असे नक्वी यांनी सांगितले.  

 

अंमलबजावणीसाठी प्रयत्न  

नक्वी यांनी गुरुवारी उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, बिहार व दिल्लीच्या अल्पसंख्याक मंत्र्यांसोबत चर्चा करून केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर योजनांचा लाभ अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोहोचवण्याचा आग्रहही केला.  

 

सरकारी नोकऱ्यांत सहभाग वाढला  

२०१४ मध्ये केंद्र सरकारमध्ये अल्पसंख्याक समुदायातील लोकांचे प्रमाण ५ टक्के होते. हेच प्रमाण २०१७ मध्ये दुपटीवर अर्थात १० टक्के झाले आहे. गेल्या वर्षीच्या सनदी सेवा परीक्षांत १२५ अल्पसंख्याक तरुणांची निवड झाली आहे. त्यापैकी ५२ मुस्लिम समुदायातील आहेत, अशी माहिती नक्वी यांनी दिली.