आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमधील दहशतवादी भाऊ, खात्मा झालेले माझ्यासाठी शहीद;पीडीपी आमदारचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 जम्मू- जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या सहकार्याने सरकार चालवणाऱ्या पीडीपीचे आमदार एजाज अहमद मीरने गुरुवारी पाकिस्तानचे गुणगान गायले. काश्मिरातील दहशतवाद्यांना ठार केले जाऊ नये. ते आमचे भाऊ आहेत. काश्मीरमध्ये ठार झालेले दहशतवादी असो की सामान्य माणूस ते सर्व शहीद आहेत. त्यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त केला जाऊ नये, असे बेताल वक्तव्य मीर यांनी केले. मीर एवढ्यावरच थांबले नाही. केंद्राचे वार्ताकार दिनेश्वर शर्मा यांनी हुर्रियत व दहशतवाद्यांशीदेखील चर्चा केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.  


गेल्या वर्षी मीर यांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. असे असूनही मीर यांनी दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यामुळे गुरुवारी विधानसभेत गदारोळ झाला. काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सने दहशतवादावरून भाजपवर दुटप्पी वागत असल्याचा आरोप केला. हा वाद दिवसभर सुरू होता. दुसरीकडे अधिवेशनानंंतर पत्रकारांनी बोलताना मीर यांनी घरावरील हल्ल्याबाबतही भूमिका मांडली. आम्ही भारताबद्दल बोलताे. मात्र, ते इतर गोष्टींबद्दल सांगतात. हे वैचारिक अंतर आहे. त्यातूनच घरावर हल्ला झाला. परंतु या समस्येवर चर्चेतूनच निराकरण शक्य आहे. काश्मीरची समस्येवर राजकीय पातळीवर तोडगा निघू शकतो, असा दावाही त्यांनी केला. मीर हे दक्षिण काश्मिरातील वाछी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यावरून देशभरात वादाला सुरूवात झाली आहे. 

 

‘दहशतवादी शांततेचे शत्रू’  
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, काश्मिरी जनता, विकास व शांततेचे खरे शत्रू म्हणजे दहशतवादी आणि फुटीरवादीच आहेत. त्यांना एखादा माणूस भाऊ कसा काय म्हणू शकतो? त्यांना अशीच वागणूक दिली गेली पाहिजे.  

 

‘भाजपने भूमिका सांगावी’
पीडीपी आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर जम्मू-काश्मीरमधील सरकारचा घटक पक्ष असलेल्या भाजपने आपली भूमिका सांगितली पाहिजे. भाजप अशा वक्तव्याशी सहमत आहे किंवा नाही, याबाबत स्पष्टीकरण केले जायला हवे, असे काँग्रेस प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी म्हटले आहे. 

 

‘कुणाला तरी पुढे यावेच लागेल’  

आतापर्यंत आपण २०० दहशतवाद्यांना ठार केले आहे. हे कुठपर्यंत चालणार आहे? हे थांबवण्यासाठी कुणाला तरी पुढे यावेच लागेल. ठार झालेल्यांमध्ये काही सज्ञानही नव्हते. ते काय करत आहेत, याची जाणीवदेखील त्यांना नव्हती. त्यांच्या हत्येमुळे आपल्या आनंद होऊ शकत नाही. हे आपले सामूहिक अपयश आहे. आम्ही सुरक्षा जवानांच्या मृत्यूवरही दु:खी आहोत, असे एजाज मीर यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनातून बाहेर आल्यानंतर त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. 

 

दहशतवादी मारला गेल्यास आम्ही आनंद साजरा करत नाही 
- न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार मीर यांनी म्हटले आहे, 'दहशतवादी मारले गेल्यानंतर आम्ही आनंद साजरा केला नाही पाहिजे. हे आमचे सामूहिक अपयश आहे. जेव्हा सेक्यूरिटी फोर्सचे जवान शहीद होतात तेव्हाही आम्हाला दुःख होते. जवान आणि दहशतवाद्यांच्या कुटुंबियांबद्दल आम्हाला सहानुभूती असली पाहिजे.'
- मीर पुढे म्हणाले, 'काश्मीरमध्ये जे दहशतवादी मारले जातात ते शहीद आहेत. ते आपलेच बांधव आहेत. त्यातील काही अल्पवयीन देखील असतात. त्यांना तर हेही माहित नसते की ते काय करत आहेत.'
- मीर यांच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मत्री मुख्तार अब्बास नकवींनी म्हटले आहे, 'दहशतवादी आणि फुटीरतावादी हे काश्मीर, काश्मीरी जनता आणि विकास व शांततेचे शत्रू आहेत. त्यांना कोण कसे बांधव म्हणू शकतो?

बातम्या आणखी आहेत...