आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजवाद, बहुजन हिताच्या गोष्टी करणारे सत्तेचे भुकेले, त्यांना बंगल्यांतच रस- मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रधानमंत्री मोदींनी संत कबीर यांच्‍या समाधीवर चादर चढवली. त्‍यांनी कबीर गुफेलाही भेट दिली. - Divya Marathi
प्रधानमंत्री मोदींनी संत कबीर यांच्‍या समाधीवर चादर चढवली. त्‍यांनी कबीर गुफेलाही भेट दिली.

मगहर, संत कबीरनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संत कबीर यांच्या ५०० व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर प्रदेशमधील मगहर या त्यांच्या निर्वाणस्थळी पोहोचले. मगहरला जाणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. तेथे एका जाहीर सभेत मोदींनी कबीरांचे दोहे ऐकवून विरोधकांवर हल्ला केला.

 

ते म्हणाले की, महापुरुषांच्या नावावर समाजाला उद्ध्वस्त करणारे राजकारण केले जात आहे. राजकीय फायदा घेता यावा म्हणून वाद व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे. अशा लोकांना कबीर कधीही समजलेच नाहीत. आमचे सरकार कबीरांच्या नीती-रीतीप्रमाणेच काम करत आहे. समाजवाद आणि बहुजनांच्या गोष्टी करणारे सत्तेचे लालची आहेत. उत्तर प्रदेशात आधी जी सरकारे होती, त्यांना स्वत:च्या बंगल्यांतच जास्त रस होता. गरिबांसाठी घरे बांधण्याच्या प्रकरणात ते हातावर हात ठेवून बसत होते.

 

मोदी म्हणाले की, मगहरमध्ये २४ कोटी रुपये खर्च करून महात्मा कबीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध संस्था स्थापन केल्या जातील. या संस्था पूर्व उत्तर प्रदेशमधील प्रादेशिक भाषांच्या विकासाचेही काम करतील. कबीर आपल्या कर्मामुळे वंदनीय ठरले. गरिबीतून वर आले आणि कपाळावरील चंदनाचा टिळा झाले. कबीरदासांचा प्रवास व्यक्ती ते अभिव्यक्ती असा झाला. त्यापुढेही सांगायचे तर ते शब्दब्रह्म झाले, विचार म्हणून समोर आले आणि व्यवहार बनून अमर झाले.

 

खुर्चीसाठी सर्व विरोधक झाले एकत्र : मोदी म्हणाले की, कबीरांनी मोक्षाचा मोह केला नाही, पण समाजवाद आणि बहुजनांना ताकद देण्याच्या नावावर राजकीय पक्षांची सत्तेची अभिलाषा दिसते. आणीबाणी लावणारे आणि तिला विरोध करणारे आज सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले आहेत.


मोदी, योगी मगहरमध्ये २ तास राहिले, कबीरांच्या समाधीवर चादर अर्पण
मोदींनी कबीरांच्या ६२० व्या प्रकट दिन उत्सवानिमित्त मगहरमध्ये संत कबीर अकादमीचे भूमिपूजन केले. त्यांनी कबीरांच्या समाधीवर चादर अर्पण केली. मगहर हे संत कबीरनगर जिल्हा मुख्यालयापासून ५ किमी अंतरावरील गाव आहे. तेथे कबीर यांची मजार, मंदिर आणि गुरुद्वारा या तिन्हींतून कबीरांच्या समरसता संदेशाचा प्रत्यय येतो.

 

कबीरांच्या धोरणानुसारच सरकारचे ४ वर्षांपासून काम : मोदी
 मोदी म्हणाले, कबीर यांनी म्हटले होते, ‘मांगन मरण समान है, मत कोई मांग्यो भीख, मांगन से मरना भला,’ पण आपल्या धोरणकर्त्यांना अजूनही कबीरांचे धोरण समजले नाही. ४ वर्षांत आम्ही ही रीती-नीती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. कबीरांनी म्हटले होते, कल करे सो आज कर. आमच्या सरकारचाही त्यावर विश्वास आहे. कबीर कर्मयोगी होते, आज देशात होत असलेला विकास कबीरांच्या कर्मयोगाचाच एक मार्ग आहे.

 

कबीरदासांच्या शिष्यांच्या बहाण्याने मागासवर्गीयांवर नजर
 काशीचे खासदार असलेल्या मोदींनी २०१९ च्या निवडणुकीआधी मगहरची निवड केली आहे. कबीरांनी लिहिले होते, ‘जस काशी तस मगहर उसर.’ मोदींसाठी २०१४ मध्ये काशी राजकीयदृष्ट्या खूप योग्य ठरली होती. आता त्याच अपेक्षेने ते मगहरला गेले. मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय कबीरपंथी आहेत. मगहरमध्ये कबीरांच्या प्रकट उत्सवात देशभरातील कबीरपंथी मठांचे प्रमुख येत आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, मोदींच्या मार्गावर योगी, टोपी घालण्यास दिला नकार....

 

बातम्या आणखी आहेत...