आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- दिल्लीतील बुराडीत एकाच कुटुंबातील ११ जण मृत आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार, सर्वांचा मृत्यू फास लागल्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घरात सापडलेल्या रजिस्टरवरून हा प्रकार अंधश्रद्धेतून झाल्याचा संशय आहे. यामुळे सामूहिक आत्महत्येचा संशय आहे. प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याचे कलम लावले जाईल. मोक्षप्राप्तीच्या नावाखाली कुटुंबाचे ब्रेन वॉश करणाऱ्या व्यक्तीचा शोधही पोलिस घेत आहेत.
कुटुंबाच्या संपर्कातील बाबा, पंडित व गुरूची माहिती गोळा केली जात आहे. या घटनेआधी घरी नेहमी येणारा तरुणही घटनेनंतर गायब झाला आहे. घरात सापडलेले ८ मोबाइल फोन व एका टॅब्लेट्समधील नंबरचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. बाहेरील व्यक्तीने सर्वांची हत्या केली नसल्याचे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले. घरातून कुटुंबातील सदस्यांच्या बोटांचे ठसे मिळाले आहेत. एकाही मृतदेहावर जखमांचे व्रण नाहीत. यावरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे वाटत नाही. या हत्या असल्याचा संशय नारायण देवी यांची कन्या सुजाता नागपाल यांनी व्यक्त केला.
११ सदस्य, जाळीत ११ सळया, भिंतीत ११ पाइप
पोलिसांना घरातील भिंतीत प्लास्टिकचे ११ पाइप, जाळीत ११ सळया आढळल्या. ४ पाइप सरळ तर ७ वेडेवाकडे आहेत. एक पाइप ३-४ फूट वर आहे.मृतांत ४ पुरुष व ७ महिला आहेत. या पाइपशी मृत्यूचे कनेक्शन जोडले जात आहे. घरात हवा येण्यासाठी हे पाइप लावल्याचे कोटा येथून आलेल्या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा असलेल्या दिनेशने म्हटले.
मृत्यूच्यावेळी कोणीही विरोध केला नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे स्पष्ट होत आहे की, मृत्यू होत असताना कोणीही कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. त्याचे कारण म्हणजे कोणत्याही मृतदेहावर विरोध केल्याच्या खुणा नाहीत.
घरात सापडले रजिस्टर
पोलिसांना घरात एक रजिस्टर सापडले. त्यात काही धार्मिक बाबी लिहिलेल्या होत्या. पोलिसांच्या मते, रजिस्टरमध्ये लिहिलेल्या बाबी आणि मृत्यूची पद्धत यात अनेक साम्य होती. पोलिसांच्या मते, एका ठिकाणी लिहिले होते की, मोक्ष प्राप्त करायचा असेल तर जीवनाचा त्याग करावा लागेल. आणि जीवन त्याग करण्यासाठी मृत्यूला कवटाळावे लागेल. वेदनांपासून सुटका हवी असेल तर डोळे बंद करावे लागतील.
जमीनीवर का होता, महिलेचा मृतदेह
रजिस्टरमध्ये ज्येष्ट महिलेचाही उल्लेख आहे. त्यात लिहिले आहे, आई फार वयस्कर आहेत. त्यामुळे त्या साधना करण्यासाठी स्टूलवर चढू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना दुसऱ्या खोलीत साधना करावी लागेल. पोलिसांच्या मते या महिलेची हत्या गळा दाबून करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.