आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायबरेली- भारतीय जनता पक्ष सतत खोटे बोलत आहे. या पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केली. काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी प्रथमच रायबरेली आणि अमेठी या मतरदारसंघांच्या दौऱ्यावर आले आहेत.
रायबरेली जिल्ह्यातील सालोन येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली. हे शहर अमेठी लोकसभा मतदारसंघात येते. राहुल म्हणाले की, भाजपचे लोक सातत्याने खोटे बोलत आहेत. लोकांच्या बँक खात्यांत १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिले होते. शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचे आणि रस्ते चांगले करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते, पण यापैकी कुठलेही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. देशात लाखो तरुण बेरोजगार आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याबद्दल चकार शब्दही बोलत नाहीत.
भाजपचा हा खोटेपणा उघडा पाडण्याची जबाबदारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन करून राहुल गांधी म्हणाले की, अमेठीत आपण अनेक विकासकामे केली आहेत. त्यात महामार्ग, रेल्वे मार्ग, फूड पार्क यांचा समावेश आहे. ही कामे कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसने कोणती कामे केली आणि मोदी सरकारने काय केले हे लोकांना सांगावे लागेल. काहीही झाले तरी अमेठीत फूड पार्क होईल. आमचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव देण्यात येईल. जाहीर सभेनंतर राहुल गांधी यांचा ताफा निघाला असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
गोरखपूर; राहुल यांनी विकासावर लक्ष द्यावे : आदित्यनाथ
राहुल गांधी यांनी ‘नकारात्मक राजकारण’ बंद करावे आणि त्याऐवजी विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी दिला. आदित्यनाथ म्हणाले की, नेहरू-गांधी कुटुंबाच्या चार पिढ्यांनी अमेठीचे प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसने विकास केला असता तर हा मतदारसंघ अविकसित राहिला नसता.
हनुमान मंदिरात जाऊन घेतले दर्शन
राहुल गांधी यांनी अमेठीला जाणाऱ्या रस्त्यावरील एका हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आपला दोन दिवसांचा दौरा सुरू केला. राजधानी लखनऊत आगमन झाल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर त्यांनी लखनऊ-रायबरेली रस्त्यावरील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राहुल यांनी प्रथमच या मंदिरात दर्शन घेतले असावे, अशी प्रतिक्रिया रामकुमार या कार्यकर्त्याने दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.