आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचनसंस्कृतीचा ‘अभिरुची’संपन्न वारसा वृृद्धिंगत व्हावा : डॉ. काळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सयाजीराव गायकवाड संमेलननगरी (बडाेदा)- ‘अभिरुची’ या शीर्षकांतर्गत  संमेलननगरीतील  ग्रंथप्रदर्शनाचे औपचारिक उद््घाटन मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या  हस्ते शुक्रवारी झाले. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, मराठी वाङ‌्मय परिषद, बडोदे येथील कार्याध्यक्ष दिलीप खोपकर तसेच महामंडळाचे अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

  
डॉ. अक्षयकुमार काळे म्हणाले,‘हे संमेलन ज्या बडोदेनगरीत आयोजित केले आहे, तिथे कला, साहित्य, संस्कृतीची समृद्ध परंपरा विकसित झाली आहे. ‘अभिरुची’सारख्या  अत्यंत दर्जेदार नियतकालिकाचा  वारसा या नगरीला लाभला आहे. काळ बदलला असला तरी वाचनसंस्कृती अबाधित  राहावी, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संमेलनासारखी उत्सवी घटना वाचनसंस्कृतीसाठी पूरक ठरणारी आहे, ती जपली पाहिजे.’ तर श्रीनिवास पाटील यांनीही नव्या काळात वाचनसंस्कृतीचे जतन करण्याची गरज असल्याचे मत मांडले.    


प्रकाशक संघाची माघार 

छोट्या प्रकाशकांना अर्थसाह्य  करणारी योजना घेऊन, तिचा मोठा गाजावाजा करणाऱ्या मराठी प्रकाशक संघावर या योजनेमार्फत आर्थिक साह्याची कुणीच मागणी न केल्याने सपशेल माघार घेण्याची नामुष्की ओढवली. या योजनेतून बाहेर पडत असल्याचे  पत्र  प्रकाशक संघाने आर्थिक साह्य देणाऱ्या कॉसमॉस बँकेकडे पाठवल्याची माहिती बँकेचे वरिष्ठ अधिकारी गोविंद क्षीरसागर यांनी दिली. बडोद्यात  प्रथम झालेले साहित्य संमेलन न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. डॉ. केळकर हेच कॉसमॉस बँकेचे संस्थापक संचालक असल्याने हा योग साधून आम्ही आर्थिक साह्याची तयारी दर्शवली होती, पण प्रकाशक संघाने त्यातून माघार घेतल्याचे गाेविंद क्षीरसागर यांनी सांगितले.

 

ग्रंथप्रदर्शनात शुकशुकाट  
बडोद्यातील  महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीतील ‘अभिरुची’ ग्रंथप्रदर्शनात  १३६ ग्रंथदालनांची नोंदणी झाल्याची माहिती ग्रंथप्रदर्शन समन्वयक रमेश  राठीवडेकर आणि अनिल कुलकर्णी यांनी दिली. संमेलन राज्याबाहेर असल्याने मराठी पुस्तकांच्या विक्रीची फारशी शक्यता नसल्याने अनेक प्रकाशकांनी प्रदर्शनाकडे पाठ फिरवली आहे. मौज, मॅजेस्टिक, रोहन, राजहंस, अक्षरधारा, मेहता, मनोविकास, समकालीन आदी मोजक्या  प्रकाशकांची उपस्थिती प्रदर्शनात आहे. धार्मिक, आध्यात्मिक  विचारांचा पुरस्कार करणारी काही प्रकाशने, साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांची दालने आणि काही शासकीय दालने यांची उपस्थिती प्रदर्शनात आहे.    

बातम्या आणखी आहेत...