आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राने पाठवलेल्या निधीवर सिद्धरामय्या सरकारचा डल्ला; अमित शहा यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोप्पल (कर्नाटक) - केंद्र सरकारने कर्नाटक राज्याच्या विकासासाठी पाठवलेल्या निधीवर सत्ताधारी सिद्धरामय्या सरकारने डल्ला मारला आहे. हे पैसे आपल्याच खिशात घातले आहेत, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.  


शुक्रवारी सायंकाळी आयोजित एका जाहीर सभेत शहा यांनी काँग्रेस सरकारला चांगलेच घेरले. १३ व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात कर्नाटक सरकारला २,१९,५०६ कोटी रुपये मिळाले होते. परंतु हा निधी सिद्धरामय्या सरकारने आपल्याच खिशात घातला होता व केंद्राच्या अनुदानावरील योजनांची अंमलबजावणी होऊ दिली नाही. त्यासाठी हा निधी खर्च केला नाही, असा दावा शहा यांनी केला. राज्यात दर पाच वर्षांत प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार होतो हे वास्तव आहे. काँग्रेसचे सरकार असलेल्या या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ झाली आहे.

 

महिलांवरील अत्याचारांतही वाढ झाली. बेरोजगारीची समस्या वाढू लागली आहे. राज्यातील सामान्य जनतेला पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करून दिली जात नाही. उदरनिर्वाहासाठी आवश्यक रोजगारही मिळत नाही. परंतु राज्याचे मुख्यमंत्री ४० लाखांची महागडी घड्याळे घालतात. त्यावरून सरकारमध्ये भ्रष्टाचार किती बोकाळला आहे हे दिसून येते, असा टोला शहा यांनी लगावला.  


दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची का वेळ आली ?  
सिद्धरामय्या यांना आपल्या विजयावर खूप विश्वास वाटतो. तसे असल्यास ते नेहमीचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक का लढवू लागले आहेत, असा प्रश्न शहा यांनी सभेत उपस्थित केला. काँग्रेस पक्ष सिद्धरामय्या यांच्यावर संपूर्णपणे अवलंबून आहे. मात्र ते स्वत: दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवू लागले आहेत. ही बाब हास्यास्पद आहे. कारण त्यांना गृह जिल्हा म्हैसूरमधून निवडून येण्याची शाश्वती वाटत नाही. त्यामुळेच त्यांनी बदामी विधानसभा मतदारसंघातूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यातून आपले राजकीय भवितव्य सुरक्षित राहावे, असा त्यांचा उद्देश आहे. त्यांना विजय दूर दिसत असावा. त्यामुळेच त्यांनी दोन मतदारसंघांचा निर्णय घेतला. 

बातम्या आणखी आहेत...