आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडोद्यात मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या घटतीच; भाषकांची संख्या तब्बल साडेचार लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी)  बडोदा- बडोद्यात मराठी भाषकांची संख्या तब्बल साडेचार लाख  इतकी असूनही महाराष्ट्राप्रमाणेच येथेही मराठी माध्यमाच्या शाळा धडाधड बंद पडत असल्याची माहिती पुढे आली आहे.  महाराणी चिमणाबाई हायस्कूल ही एकमेव शाळा मराठी माध्यमाची पताका खांद्यावर घेऊन आज उभी आहे.गंमत म्हणजे  या शाळेत तरी विद्यार्थी नियमितपणे यावेत यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणारी सुविधा सवलतीत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मिळाली.    


महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाने नावाजलेल्या बडोद्यामध्ये महाराणी चिमणाबाई हायस्कूल ही सर्वात जुनी मराठी माध्यमाची शाळा आहे. त्यासोबत जे एम ज्युनियर हायस्कूल, एच. जे. परिख मॉडेल हायस्कूल आणि महाराणी हायस्कूल फॉर गर्ल्स अशा मराठी माध्यमाच्या एकूण चार शाळा बडोद्यामध्ये चार-पाच वर्षांपूर्वी होत्या. मात्र इंग्रजी भाषेचे महत्त्व आणि प्रस्थ देशातील सर्वच प्रांतात मुलांच्या शिक्षणासाठी वाढत चालले  आहे. त्याचा थेट परिणाम बडोद्यातील मराठी माध्यमाच्या शाळांवर झाला असून गेल्या चार वर्षांत वरीलपैकी तीन मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या आहेत.     


९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदानगरीत होत असताना लक्षावधी मराठी बांधवांच्या या शहरात आता महाराणी चिमणाबाई हायस्कूल ही मराठी माध्यमाची एकमेव शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सलाटवाडा या शहराच्या मध्यवर्ती भागात महाराणी चिमणाबाई हायस्कूल ही शाळा १९११ पासून सुरू आहे. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे याच शाळेत शिक्षण झाले असून बडोद्याला आल्यानंतर ते नेहमी या शाळेला भेट देत असत, अशीही माहिती येथील बुजुर्गांकडून मिळाली. सध्या या शाळेत ५५० विद्यार्थी शिकत आहेत. मात्र अन्य शहरांप्रमाणेच बडोद्याचा विस्तार वाढल्याने पूर्वी मध्यवर्ती भागात असलेल्या या शाळेत विद्यार्थी आता लांबून येतात. त्यापैकी अनेक  विद्यार्थी मध्यमवर्गीय अाहेत. अनेकदा लांब अंतरामुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडते. हे विद्यार्थी वेळेत शाळेत यावेत, शाळा केवळ अंतराच्या कारणामुळे बुडू नये यासाठी त्यांना शाळेतून ने-आण करण्यासाठी सवलतीच्या दरात रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी मराठी वाङ््मय परिषदेने पुढाकार घेतला असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष खोपकर यांनी दिली. 

 

साहित्यिकांच्या  मानधनाची तुष्टी-पुष्टी   
साहित्य संमेलनाचे खर्च अवाढव्य होत आहेत. त्यात सहभागी साहित्यिकांचे मानधनही समाविष्ट आहे. संमेलन साधेपणाने करता यावे यासाठी बडोदा येथील साहित्य संमेलनातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असलेल्या लेखक व कवींनी मानधनाची अपेक्षा ठेवू नये, असे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केले होते. सुरुवातीला  या आवाहनाला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, मराठी वाङ््मय परिषद या संयोजक संस्थेने लेखक – कवींना मानधन देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. चर्चासत्रातील मान्यवर आणि कविसंमेलनातील सहभागी कवींना  रेल्वेचे भाडे आणि दोन हजार रुपये मानधन देण्यात आले आहे. याबाबत कोणत्याही मान्यव राने तक्रार केली नसल्याचे लेखक – कवी मानधनाबाबत संतुष्ट आहेत, असे म्हणता येईल, अशी माहिती दिलीप खोपकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...