आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात शहिदांच्या गावांत उभारणार वीरपुत्रांचे पुतळे, 25 कोटींचा खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिकर - राजस्थानमधील वर्ष १९९९ आधी शहीद झालेल्या शहिदाचा पुतळा शहिदाच्या गावात उभारला जाणार असून असे करणारे हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्या गावातील शाळेलाही शहिदाचे नाव देण्यात येणार आहे. शहिदाच्या कुटुंबीयांतील एका सदस्याला सरकारी नोकरीही देण्यात येईल. ही प्रक्रिया पुढील चार महिन्यांत पूर्ण करण्यात येईल.

 

राज्यात १९९९ आधी सुमारे १६५० सैनिक शहीद झाले आहेत. यातील ११०० सैनिकांचे पुतळे आतापर्यंत उभारलेले नाहीत. यातील काही सैनिकांचे तर फोटोही त्यांच्या कुुटुंबीयांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे संरक्षण विभागातील रेकॉर्डमधून त्यांचा फोटो घेण्यात येणार आहेत. या शहीद सैनिक सन्मान यात्रेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही होणार आहे. त्यासाठीचा अर्जही स्वीकारण्यात आला आहे.  


२२ जिल्ह्यांचा समावेश  : या  योजनेवर सुमारे २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे  सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष तसेच राज्यमंत्री प्रेमसिंह बाजौर यांनी सांगितले. ही रक्कम बाजौर स्वत: खर्च करणार आहेत. सैनिक यात्रेने आतापर्यंत एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. सैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांनी तसेच त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी एकदा राजस्थानला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. राजस्थानमध्ये सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ एक दशकापासून सैनिक यात्रा काढली जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली. राज्यातील २२ जिल्ह्यांतून जाणाऱ्या  या यात्रेदरम्यान वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

 

सरकारी नोकरीची प्रक्रिया चार महिन्यांत : प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या यात्रेवर सुमारे २५ लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याचे प्रेमसिंह बाजौर यांनी सांगितले. शहीद कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

आतापर्यंतची कामे : २२ जिल्ह्यांतील १०१६ शहीद सैनिकांच्या वीरपत्नी आणि कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला आहे. त्यांच्या समस्यांचे १४४० अर्ज मिळाले आहेत. सर्वांना शहिदांची माहिती मिळावी यासाठीच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 

सर्वांना शहिदांची ओळख व्हावी  
१९९९ च्या आधीच्या शहिदांसाठी एकही योजना नाही. त्यांचे सरकारने पुतळे उभारलेले नाहीत किंवा त्यांच्या कुटुंबीयांसाठीही काही केलेले नाही. पुतळे उभारण्यासाठी सरकार जमीन देऊ शकते. त्यासाठी चबुतरा बनवणे किंवा संरक्षण भिंत उभारण्यासाठी खासदार किंवा आमदार कोट्यातून निधी देता येतो. मात्र, पुतळा तयार करण्यासाठी सरकार निधी खर्च करू शकत नसल्याची अडचण होती, असेही बाजौर म्हणाले.   

बातम्या आणखी आहेत...